Guillain-Barre Syndrome: पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’चे 24 संशयित रुग्ण; शरीरातील कोणत्या अवयवावर होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर
Guillain-Barre Syndrome: संशयित रुग्णांपैकी आठ रुग्णांचे रक्त आणि लघवीचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
Guillain-Barre Syndrome in Pune: पुणे शहरात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ या (Guillain-Barre Syndrome) न्यूरोलॉजिकल आजाराचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीतील 6 खासगी रुग्णालयांमध्ये 24 संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्यापैकी 8 रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. तर त्यापैकी 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सर्वांत कमी वयाचा रुग्ण 2 वर्षांचा आहे, तर सर्वाधिक वयाचा रुग्ण 68 वर्षांचा असल्याची माहिती आहे.
‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ (Guillain-Barre Syndrome) या आजाराने बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात करते. हाता-पायांमधील ताकद कमी होणे आणि मुंग्या येणे, गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे या आजारामध्ये दिसून येत आहेत. संशयित रुग्णांपैकी आठ रुग्णांचे रक्त आणि लघवीचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
पुण्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम' (Guillain-Barre Syndrome) या आजाराच्या 24 संशयित रुग्णांची नोंद झाल्यानंतर आता महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. 8 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 2 रुग्णांवर 'व्हेंटिलेटर'वर उपचार सुरू आहेत. 24 रुग्णांपैकी 5 रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीतील आहेत, तर अन्य रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील असल्याची माहिती आहे. सिंहगड रस्ता, कोथरुड, कसबा भागात संशयित रुग्ण आढळलो आहेत. सर्व 24 रुग्णांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात दाखल असलेल्या रुग्णांपैकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 10, सह्याद्री (डेक्कन) एक, भारती रुग्णालय तीन, काशीबाई नवले रुग्णालय 4, पूना हॉस्पिटल 5 आणि औंध येथील अंकुरा हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण दाखल आहे. संशयितांपैकी आठ रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्ही पाठविण्यात आले आहे.
पुणे महापालिका अलर्ट मोडवर
'गुलेन बॅरी सिंड्रोम'चे रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेतर्फे खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्ण आढळलेल्या परिसरापैकी काही भागात शुद्धीकरण न केलेले पाणी पुरवले जाते. त्यामुळे त्या पाण्याचे नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर जेथे रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील पाण्याचे नमुनेही घेण्यात येऊन त्याची चाचणी केली जाणार आहे.
कशामुळे होतो आजार?
'गुलेन बॅरी सिंड्रोम' हा जीवाणू किंवा विषाणूमुळे होणारा संसर्ग, ऑटो-इम्युन डिसीज, एखादी मोठी शस्त्रक्रिया होणे किंवा मेंदूशी संबंधित आजार, अशा विविध कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. प्रतिकारशक्ती शरीरातील नसांवर हल्ला करते. त्यामुळे हात-पायांमधील ताकद जाते आणि हालचालींवर मर्यादा येतात. याच्या निदान करण्यासाठी स्पायनल फ्लुईडची चाचणी केली जाते. यामुळे रुग्णाला अर्धांगवायू येऊ शकतो. तीन-चार आठवडे उपचार घेतल्यावर 95 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरेही होतात.
गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय ?
1) गुलेन बॅरी सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार, आजारामुळे स्नायू कमकुवत होतात.
2) स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात, संवेदना कमी होतात.
3) चेहरा, डोळा, छाती, शरिरातील स्नायूंवर परिणाम, तात्पुरता अर्धांगवायू, श्वसनाचा त्रास होतो.
4) हाताची बोटं, पाय यांत वेदना, चालताना समस्या, चिडचिड, चेहऱ्यावर कमजोरी ही प्रमुख लक्षणं आहेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )