Pune Gram Panchayat Election Result 2022: पुण्यात उमेदवारावर 'नोटा' भारी; या नियमानुसार उमेदवार रेखा साळेकर 'विजयी'
पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एक अचंबित करणारा निकाल लागला आहे. म्हाकोशी गावात विजयी उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मतं पडली. त्यामुळं आख्ख गाव संभ्रमावस्थेत पडलं होतं.
Pune Gram Panchayat Election Result 2022: पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एक अचंबित करणारा निकाल लागला आहे. म्हाकोशी गावात विजयी उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मतं पडली. त्यामुळं आख्ख गाव संभ्रमावस्थेत पडलं होतं. आता हे सदस्यपद रिकामं राहणार की पुन्हा निवडणूक होणार? असे तर्कवितर्क लढवले जात असतानाच निवडणूक आयोगाच्या एका नियमानुसार दोन नंबरची मतं मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं.
पराजय होऊनही विजयी ठरलेल्या या नशीबवान सदस्याचं रेखा विजय साळेकर असं नाव आहे. रेखा यांना 43 तर त्यांच्या विरोधात नोटाला 104 मतं मिळाली होती. म्हाकोशी गावात प्रभाग क्रमांक एक मध्ये हा अचंबित करणारा निकाल लागला आहे. या प्रभागात सर्व साधारण महिलांसाठी दोन जागांचं आरक्षण पडलं होतं. तिघांनी अर्ज दाखल केले आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार दोन जागांसाठी निवडणूक असल्यानं दोन नोटांचे पर्याय मतदारांसाठी देण्यात आले होते. विजयासाठी तिन्ही उमेदवारांनी कंबर कसली होती. प्रचाराच्या तोफा थंड झाल्या आणि 340 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद केलं.
पुन्हा निवडणूक लागणार?
तिन्ही उमेदवारांनी मतमोजणीला हजेरी लावली. संगीता तुपे यांना 123 मतं मिळाली आणि दोन पैकी एका जागेवर त्यांचा विजय निश्चित झाला. त्यानंतर दुसऱ्या उमेदवाराच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उर्वरित दोन उमेदवारांसह सगळं गाव बुचकळ्यात पडलं. कारण नोटाला 104 तर रेखा साळेकरांना 43 आणि कविता शेडगेंना 42 मतं पडली होती. अशा परिस्थितीत आता प्रभाग एक मधून दुसरी विजयी उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा होणार? की पुन्हा निवडणूक लागणार? असा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला होता.
अन् रेखा साळेकरांचं नशिब उजाडलं...
त्यामुळे हा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राखून ठेवला. इतर ग्रामपंचायतींचे निकाल घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटलांनी म्हाकोशी गावातील राखून ठेवलेल्या निकालाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांनी निवडणूक आयोगाची नियमावली हाती घेतली. यात 12 नोव्हेंबर 2013च्या अध्यादेशानुसार नोटा पर्यायाला मिळालेल्या मतांची संख्या लक्षात न घेता त्यानंतर ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली ती विजयासाठी ग्राह्य धरावीत, असं सूचित केलेलं आहे. या नियमानुसार रेखा विजय साळेकरांना विजयी म्हणून घोषित करण्यात आलं. अशा पद्धतीने नोटा ने पराभव केलेल्या साळेकरांच्या नशिबी असा 'विजय' आला.