स्वर्गीय आज्जीच्या एका मताने नातवाचा 'विजय'! पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घटना
पुण्याच्या मुळशी तालुक्यात 113 वर्षीय आज्जींच निधन झालं पण जाता-जाता आज्जीने नातवाला ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान केलं. हे कसं घडलं पाहा या स्पेशल रिपोर्ट मधून.
पुणे : दिवंगत सरुबाई साठे या आज्जींनी वयाच्या 113व्या वर्षी नातवाला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून दिलाय. म्हणून आज नातू विजय साठे ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान झालेत. मृत्यूनंतर त्यांनी कसा काय विजय मिळवून दिला असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. तर घडलं असं की पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वाळेज ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडलं. त्यादिवशी सरुबाई आज्जींनी नातवासाठी मतदानाचा हक्क बजावला आणि त्याच रात्री अखेरचा श्वास घेतला. आज्जीला निरोप दिल्यानंतर 18 जानेवारीला निकाल लागला, त्यात अवघ्या एका मताने विजय झाला. त्यामुळेच आज नातवाच्या डोळ्यात दुःखासह आनंदाश्रू ही वाहतायेत.
साठे कुटुंबियांच्या तीन पिढ्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठसा उमटवतायेत. सरुबाई आज्जीचे पती आणि दोन मुलं माजी सरपंच राहिलेत. पण नातू विजयला मात्र खूप संघर्ष करावा लागला ते आज्जीला खुपत होतं. ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान होण्यासाठी विजय साठे गेल्या 16 वर्षांपासून संघर्ष करत होते. 2005 आणि 2010 च्या निवडणुकीत विजयाने त्यांना हुलकावणी ही दिली. तर 2015ची इथली निवडणूक बिनविरोध झाली. यंदा मात्र निवडणूक लागली, त्यांनी नशीब आजमावण्याचं ठरवलं, अर्ज ही दाखल केला आणि अखेर अवघ्या एका मताने त्यांना विजय मिळाला. हा विजय म्हणजे आज्जीने दिलेला आशीर्वादच असल्याची भावना सर्वजण व्यक्त करतायेत.
सरुबाई आज्जींच्या जाण्याने साठे कुटुंबात दुःख आहे. पण जात-जाता त्यांनी नातू विजयचा संघर्ष संपवला याचा आनंदही कुटुंबात दरवळतोय. आता आज्जीने मतरुपी दिलेला आशीर्वाद गावचा विकास करून नातवाने सार्थ ठरवायला हवा. तेव्हाच आज्जीला खरी श्रद्धांजली मिळेल.
Gram Panchayat Election Results 2021 | लय भारी! विजयी पतीला खांद्यावर घेऊन पत्नीचा जल्लोष