Pune Ganeshotsav 2023 : वजनाने हलक्या, सुबक आणि तुमच्या बजेटमध्ये; कागदाच्या लगद्यापासून बनवलेले आकर्षक गणपती
शहरात आता कागदापासून तयार केलेले पर्यावरणपूरक गणपती उपलब्ध झाले आहेत. 'हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट'तर्फे या गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
![Pune Ganeshotsav 2023 : वजनाने हलक्या, सुबक आणि तुमच्या बजेटमध्ये; कागदाच्या लगद्यापासून बनवलेले आकर्षक गणपती ganesha idol made shadu clay and paper pulp in pune by handmade paper institute Pune Ganeshotsav 2023 : वजनाने हलक्या, सुबक आणि तुमच्या बजेटमध्ये; कागदाच्या लगद्यापासून बनवलेले आकर्षक गणपती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/01/5c69d0860eb7751a7a46da03f668af2d1693562587753442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : गणेशोत्सव म्हटलं की, गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती बघायला मिळतात. आपल्या घरातील मूर्ती सगळ्यात सुंदर आणि आकर्षक असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे अनेक भाविक घरगुती गणपतीसाठी वेगवेगळे पर्याय आणि आकर्षक मूर्ती शोधत असतात. त्यात पर्यावरणपुरक मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारचे फेटे घालून असलेले गणपती तर कधी इको फ्रेंडली गणपतीच्या शोधात असतात मात्र घरातील लहानग्यांना उचलण्यासाठी या मूर्ती फार जड असतात. त्यामुळे यंदा पुण्यात कागदाच्या मूर्तीला चांगलीच पसंती मिळत आहे.
शहरात आता कागदापासून तयार केलेले पर्यावरणपूरक गणपती उपलब्ध झाले आहेत. 'हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट'तर्फे या गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाडूची माती आणि कागदी लगद्यापासून बनलेली मजबूत आणि आकर्षक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा उपक्रम हातकागद संस्थेबरोबरच पेणच्या गणेशमूर्ती कारागिरांना देखील उभारी देणारा ठरत आहे. हस्तोद्योग, शाश्वत आणि पुनर्वापर या तत्त्वावर आधारित या गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत.
यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती, म्हैसुरी, पद्मासनातील, पेशवाई, चौरंगावरील अशा विविध प्रकारातील, आकर्षक रंगसंगतीत आणि विविध उंचीच्या गणेशमूर्ती हातकागद संस्थेच्या दालनात उपलब्ध आहेत. या सर्व मूर्ती शाडूची माती आणि कागदी लगदा यांच्या मिश्रणातून बनविण्यात आल्या असल्याने त्या पर्यावरणपूरक आणि मजबूत आहेत.
मुर्ती वजनाने हलकी...
गणपतीबाबत लहानग्यांना मोठी क्रेज असते. अनेक लहानमुलांना गणपती स्वत: घरी घेऊन जायचा असतो. मात्र गणपतीचं वजन जास्त असल्यामुळे लहानग्यांना हा गणपती उचलणं कठिण जातं. मात्र कागदापासून तयार करण्यात आलेली गणपतीची मुर्ती तुलनेनं हलकी असते. त्यामुळे अनेक लोक या मूर्तीला पसंती देताना दिसत आहे.
किती आहे किंमत ?
या कागदाच्या मूर्तींची किंमत साध्या मातीच्या मुर्तींप्रमाणेच आहे. साधारण मूर्तींच्या आकाराप्रमाणे या मूर्तींची किंमत आहे. लहान मूर्ती साधारण 900 रुपये तर मोठ्या मूर्तींची किंमत पाच हजारांपर्यंत आहे. अनेकांनी मूर्तींचं बुकिंगही सुरु केलं आहे.
वृक्षगजाननाची क्रेझ
शाडूच्या मूर्ती तर मागणी आहेच पण यंदा 'वृक्षगजानन' या प्रकारातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरत आहेत.
या गणेशमूर्ती वैशिष्ट्य म्हणजे शंभर टक्के पर्यावरणपूरक अशा शेतमातीपासून या मूर्ती बनवल्या जातात. विसर्जनावेळी या मूर्तीसोबत दिलेल्या कुंडीमध्ये विसर्जित करून त्यामध्ये झाड लावता येते, अशी या मूर्तीची खासियत आहे. या 'वृक्षगजानन' या मुर्तीची संकल्पना डॉ. अक्षय कवठाळे यांची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)