अल्पवयीन मुलाच्या हातात वाहनाचे स्टेरिंग देणं भोवलं, वडिलांना घडली तुरुंगवारी
पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाच्या हातात वाहनाचे स्टेरिंग देणं वडिलांना चांगलच महागात पडलं आहे.
पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला देणं वडिलांना चांगलंच भोवलंय. कारण अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालविल्याने पिंपरी चिंचवडमध्ये एक थरारक अपघात झाला होता. याचप्रकरणी आता वडिलांना तुरुंगाची हवा खावी लागलीये. सोबतच अन्य एकास ही अटक झालीय. ही व्यक्ती सर्व्हिसिंग सेंटरवरील असून त्याने गाडीची चावी अल्पवयीन मुलास दिली. म्हणून त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटकेतील वडिलांचे नाव तानाजी शिंदे तर सर्व्हिसिंग सेंटरवरील व्यक्तीचे आकाश बोडके असे नाव आहे. पुणे-बेंगलोर महामार्गलगत 22 डिसेंबरला झालेला हा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला होता.
तानाजी शिंदेंनी सेकंड हँड घेतलेली गाडी मंगळवारी सर्व्हीसिंगला टाकली होती. ते कामात व्यस्त असल्याने त्यांनी अल्पवयीन मुलाला गाडी घरी घेऊन यायला सांगितली. त्या मुलाने त्याच्या इतर तीन मित्रांना सोबत घेतलं आणि ते सर्व्हिसिंग सेंटरवर गेले. तिथं आकाश बोडके नामक व्यक्तीने शिंदेंचा मुलगा अल्पवयीन असताना त्याच्या हातात गाडीची चावी दिली. मग ते घराच्या दिशेने निघाले तेव्हा अल्पवयीन मुलगा सुसाट वेगाने गाडी चालवत होता. पुणे-बेंगलोर महामार्गलगत पुनावळे परिसरात ते आले तेव्हा नियंत्रण सुटल्याने गाडी पलटली आणि थेट फर्निचर आणि ग्लास डेकोरच्या दुकानांना ठोकर दिली होती.
हिंजवडी पोलिसांना याबाबत कल्पना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्याने या थरारक अपघाताची तीव्रता लक्षात आली. त्यामुळे पोलिसांनी चौघांना ही ताब्यात घेतलं, अधिकची चौकशी केली असता तो अल्पवयीन असून अकरावीचं शिक्षण घेत असल्याचं समोर आलं. याप्रकरणी अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल करून, त्याच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. अल्पवयीन मुलगा आणि वडिलांच्या जबाबात सविस्तर घटनाक्रम समोर आला. वडिलांनीच सर्व्हिसिंग सेंटर वरून गाडी आणायला सांगितल्याचे आणि चालक अल्पवयीन असल्याचे माहीत असताना आकाश बोडकेने हातात चावी दिल्याचं तपासात निष्पन्न झाले. त्यामुळं पोलिसांनी आज त्यांना अटक केली.
अल्पवयीन मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांच्या हातात वाहनांचं स्टेरिंग देणं असो अथवा स्वतःची कामं त्यांच्याकडून करवून घेण्यासाठी त्यांना वाहन चालवायला देण्याचं आमिष दाखवणं असो. या त्यांच्या निर्णयाने अनेकदा अपघात घडतात. ते सर्व पालक यातून धडा घेतील अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातमी :
मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नववधूकडून बेडरूममध्ये गळा आवळून पतीची हत्या