Ambadas Danve: 'आरोपींच्या सोयी'ने चौकशीचा फार्स; 99 टक्के भागीदार असलेल्या पार्टनरवर गुन्हा दाखल होत नाही, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंबादास दानवेंचा संतापाचा सूर
Ambadas Danve: ९९ टक्के मालकी ही पार्थ पवारांकडे असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांचं नाव कुठेही येत नसल्याने विरोधकांनी अजित पवारांसह सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार (Mundhwa land scam case) प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अमेडिया कंपनीमध्ये ९९ टक्के मालकी ही पार्थ पवारांची आहे तर १ टक्का भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावरती कारवाई करण्यात येत असून आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. तर ९९ टक्के मालकी ही पार्थ पवारांकडे (Parth Pawar) असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांचं नाव कुठेही येत नसल्याने विरोधकांनी अजित पवारांसह सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट लिहून याबाबत संताप व्यक्त केला आहे.(Mundhwa land scam case)
Ambadas Danve: अंबादास दानवेंनी काय म्हटलंय?
पोस्टमध्ये दानवेंनी म्हटलंय की, "पुण्यातील जमीन प्रकरण हे बहुदा पहिलेच असे प्रकरण मी पाहिले ज्यात 'आरोपींच्या सोयी'ने चौकशीचा फार्स सुरू आहे. पत्र-पत्र खेळण्याची कारणे आजही संपतील, याची शक्यता शून्य वाटते. न्यायालयाने ऐकवल्यावरही ९९ टक्के भागीदार असलेल्या पार्टनरवर गुन्हा दाखल होत नाही. सरकार कोर्टच्या विशेष निर्देशांची वाट पाहत आहे का?", असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील जमीन प्रकरण हे बहुदा पहिलेच असे प्रकरण मी पाहिले ज्यात 'आरोपींच्या सोयी'ने चौकशीचा फार्स सुरू आहे. पत्र-पत्र खेळण्याची कारणे आजही संपतील, याची शक्यता शून्य वाटते. न्यायालयाने ऐकवल्यावरही ९९ टक्के भागीदार असलेल्या पार्टनरवर गुन्हा दाखल होत नाही. सरकार कोर्टच्या विशेष…
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 15, 2025
Mundhwa land scam case: दिग्विजय पाटील आजतरी चौकशीला हजर राहणार का?
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील आजतरी चौकशीला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण यापूर्वी पुणे पोलिसांनी त्यांना तीन वेळा चौकशीसाठी बोलवलं होतं. त्या तिन्ही वेळा त्यांनी पुणे पोलिसांना वेगवेगळी कारणं देऊन चौकशी पुढे ढकलली आहे. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या लग्नाचं कारण आणि त्यानंतर प्रकृतीचं कारण देऊन शनिवारी देखील ते चौकशीला गैरहजर राहिले.
आज म्हणजेच सोमवारी ते चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. मात्र आज नेमकं कोणतं नवीन कारण शोधून दिग्विजय पाटील चौकशीला गैरहजर राहतील की थेट चौकशीला समोरं जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील जागा ही पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीला पॉवर ऑफ अटर्नी करुन देण्यात आली होती. त्यात दिग्विजय पाटील भागीदार असल्याने त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. याच प्रकरणात पॉवर ऑफ अटर्नी करुन देणाऱ्या शितल तेजवानी सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या कसून चौकशी संपणार आहे. आज त्यांची पोलीस कोठडी संपणार असून त्यांना पुणे पोलिसांकडून कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Ajit Pawar: अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील.., अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
मुंढवा जमीन प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता, असे अजित पवारांनी अनौपचारिक चर्चेत म्हटले आहे. त्यामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर फोडल्याचे दिसून येत आहे.























