नापास झाल्याने मित्र चिडवायचे, वैतागून विद्यार्थ्याची आत्महत्या
शुभम भोसले असं 30 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. शुभम पुण्याच्या सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र एका विषयात नापास झाल्याने मित्र त्याला चिडवत होते.
पुणे : नापास झाल्यामुळे मित्र चिडवायचे म्हणून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. रविवारी संध्याकाळी पुण्यातील रायकर मळा परिसरातील एका टेकडीच्या पायथ्याशी या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने ही घटना समोर आली.
शुभम भोसले असं 30 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. शुभम पुण्याच्या सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र एका विषयात नापास झाल्याने मित्र त्याला चिडवत होते. सततच्या या प्रकाराला कंटाळल्याने निराश होऊन शुभमने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
शुभम हा पुण्यातील धायरी परिसरात राहत होता. शुभमचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. गेल्या वर्षी एका विषयात तो नापास झाला होता. यावरून त्याचे मित्र त्याला चिडवत होते. मित्रांच्या या प्रकाराला वैतागूनच शुभमने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शुभम 4 नोव्हेंबर पासून बेपत्ता होता. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आज सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह रायकर मळा परिसरातील एका टेकडीच्या पायथ्याशी आढळला. टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सिंहगड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.