Devendra Fadnavis on Dinanath Mangeshkar Hospital: मुख्यमंत्र्यांचा 'असंवेदनशील' शब्द मंगेशकर रुग्णालयाला लागला, पत्रक काढलं, पण CM ठाम, म्हणाले, जे चूक ते चूकच, तो प्रकार असंवेदनशीलच!
dinanath Mangeshkar hospital: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटचे पैसे नसल्याने गर्भवती महिलेवर उपचार केला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाल होता.

पुणे: दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही. कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन आणि विश्वस्त मंडळाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला मला आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जोपर्यंत मी नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत याप्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी म्हटले. या प्रकरणात कारवाई केली जाणार आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक एसओपी तयार करण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर धर्मादाय आयुक्तांना नव्याने काही अधिकार देण्यात आले आहेत. भविष्यात त्यादृष्टीने कायद्यात बदल केला जाईल. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यावी, हा आमचा प्रयत्न आहे. रुग्णालयात किती बेड आहेत, ते दिले जात आहेत की नाही, हे सगळं कळण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील. ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता याप्रकरणात पुढे काय कारवाई होणार, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा























