Amit Shah : राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच? देवेंद्र फडणवीसांची रात्री अमित शाहांसोबत बैठक; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
Devendra Fadnavis meet Amit Shah : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात काल रात्री एक बैठक पार पडली आहे.
पुणे: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मेळावे, बैठका, सभा यासह घडामोडींना वेग आला आहे. अशातच गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) आलेली निराशा पुन्हा येऊ नये यासाठी भाजपसह (BJP) मित्रपक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकांयला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात बैठक घेणार आहेत. दरम्यान या बैठकीआधी काल(शनिवारी) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अमित शाहांसोबत (Amit Shah) बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शाह (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये अधिवेशनाआधी बैठक झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शाहांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला असण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी माध्यमांशी बोलताना लवकरच राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार होईल असं म्हटलं होतं. या अनुषंगाने फडणवीस आणि शाह यांच्यात याबाबतची चर्चा झाली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. आजच्या होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनात राजकीय ठराव मांडला जाण्याची देखील शक्यता आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील असल्याची माहिती आहे.
आज पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने अमित शाह हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच भाजप हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातूनच फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुतीला राज्यासह देशात मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. आज पुण्यात (Pune) भाजपचे चिंतन शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशनही आज पुण्यात पार पडणार आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते असे जवळपास 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत.