Jai Pawar: लोकसभेला दादांचा प्रचार, मनोज जरांगेंनाही भेटले, आता बारामतीतून उमेदवारीची चिन्हं, जय पवार यांची बॅकग्राऊंड काय?
Jai Pawar: विधानसभा निवडणुकीबाबत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं असून मुलगा जय पवारच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
Jai Pawar: राज्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) मतदारसंघात जात आपल्या योजनांची माहिती देत दौरे केले जात आहेत. आज पुण्यातील जनसंवाद यात्रेवेळी अजित पवारांना (Ajit Pawar) बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार (Jai Pawar) निवडणूक लढवणार आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका लढल्या आहेत. त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतली. जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.
यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी जय पवार बारामतीमधून लढण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळली नाही. अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामती विधानसभेचा निर्णय जनतेवर सोडून भविष्यातील वेगळ्या राजकारणाचे संकेत दिले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून जय पवार राजकीय वर्तुळात सक्रीय दिसून येत आहेत. अशातच अजित पवारांच्या प्रतिक्रियेमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
जय पवार कोण आहेत?
जय पवार (Jai Pawar) हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र आहेत. अजित पवार यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा पार्थ यांनी मावळची लोकसभा निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांचा दारूण पराभव झाला. तर जय हे सध्या बारामतीतील समाजकारणात सक्रीय आहेत. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे व्यवसाय सांभाळतात. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी पक्ष कार्यात सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांची धुरा जय पवारांनी सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीनंतर जय पवार बारामतीत अजित पवार नसताना जनता दरबार घेत होते.
जय पवारांनी काही दिवसांपूर्वी घेतली मनोज जरांगेंची भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र जय पवार यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली. जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.