(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Dahihandi News: यंदा पुण्यात दडीहंडीचा जल्लोष रात्री दहा वाजेपर्यंतच; पुणे पोलिसांचे आदेश
पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. याच नियमानुसार यंदा गोविंदांना दहीहंडी साजरी करता येणार आहे. यंदा रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे.
Pune Dahihandi News: कोरोनामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी महोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मात्र यासाठी देखील पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. याच नियमानुसार यंदा गोविंदांना दहीहंडी साजरी करता येणार आहे. यंदा रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे.
आज कृष्णजन्माष्ठमी झाल्याननंतर उद्या दहीहंडी उत्सव होणार आहे. यामुळे पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. मोठा फौजफाटा शहरात तैनात केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहे.
दरवर्षी या महोत्सवात कोणताही गुन्हा घडू नये यासाठी पोलीस तत्पर असतात. या वर्षी हा जल्लोष दोन वर्षांनी होणर आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये जास्त उत्साह बघायला मिळत आहे. त्यामुळे अधिक बंदोबस्त ठेवण्याच्या तयारीत पुणे पोलीस आहेत. महिलांवर छेडछाडीच्या घटना होऊ नये, यासाठी वेगळा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच मद्यपान करणाऱ्यांवर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. मोठ्या दहीहंडी असणाऱ्यांच्या वाहतूक कोंडी आणि छेडाछेडीची प्रकरणं रोखण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते पुणे पोलिसांच्या मदतीसाठी द्यावे लागणार आहे, अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे.
रुग्णवाहिका गर्दीत न अडकण्यासाठी काळजी
जल्लोषासाठी अनेक परिरसरात नागरिकांची आणि गोविंदांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हजारोंच्या संख्येनं लोक प्रत्येक दहीहंडीजवळ बघायला मिळतात. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतुक कोंडीमुळे अनेकदा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका अडकण्याची भीती असते. या दोन्ही गाड्या अडकू नये यासाठी मोठा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
शिंदे गटाकडून पुण्यात दहीहंडीत शक्तिप्रदर्शन
यंदा जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षाकडून दहीहंडीत मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यात सगळ्यात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे नगरसेवक नाना उर्फ प्रमोद भानगिरे यांच्या मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. पुण्यातील हांडेवाडीमध्ये धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.या दहीहंडी उत्सवाला शिंदे गटाचे दिगग्ज नेते मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे.