Ravindra Dhangekar: पेरले तेच उगवले..! गज्या मारणेच्या गुडांच्या मारहाण प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला; म्हणाले, '...म्हणून आपण जागे झालात'
Ravindra Dhangekar on Muralidhar Mohol: गज्या मारणेच्या गुडांच्या मारहाण प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला लगावला आहे.

पुणे : पुण्यात 19 फेब्रुवारीला गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शिवजंयतीच्या दिवशी कोथरूड परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान भाजप कार्यकर्ता असलेला देवेंद्र जोग तिथून समोरून दुचाकी घेऊन पुढे गेला. त्याचा राग आल्याने चार जणांनी त्याला थांबवलं आणि शिवीगाळ करत वाद घातला, इतक्यावरच न थांबता त्यांनी देवेंद्र जोगला मारहाण देखील केली. या घटनेवर मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करत पोलिस आयुक्तांना या घटनेबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यावेळी मारहाणीची घटना घडली तेव्हा बाहेर असल्यामुळे मोहोळ यांनी जोग याच्याशी व्हिडिओ कॉलवरून संपर्क साधला होता. मात्र, दोन तीन दिवसांनंतर ते पुण्यात आल्यावर मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोगच्या घरी सपत्नीक जाऊन त्याची भेट घेतली, विचारपूस केली. त्यानंतर या घटनेवरून माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.
'जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिस मधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे', अशा शब्दांमध्ये रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. धंगेकरांनी याबाबत सोशल मिडियावर पोस्ट लिहून संबंधित घटनेवरून मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केलं आहे.
रवींद्र धंगेकरांनी सोशल मिडिया पोस्ट?
"पेरले तेच उगवले..! जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिस मधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं. या गुंडांच्या टोळ्या आपणच पोसलेल्या आहेत. आपणच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकवण्यापासून तर पैसे वाटप करण्यापर्यंत या टोळ्यांचा वापर केला.आज याच गुंडांच्या टोळ्या माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना सर्वत्र त्रास देत आहेत.फरक फक्त इतकाच आहे की, आज ते तुमच्या ऑफिस पर्यंत पोहचलेत म्हणून आपण जागे झालात", अशा शब्दात धंगेकरांनी मोहोळ यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.
पेरले तेच उगवले..!
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) February 22, 2025
जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिस मधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर…
नेमकं प्रकरण काय?
कोथरूड परिसरात गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.19 फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती, त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांची वादविवाद झाला आणि त्यामुळे ते चौघे मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार यांचे नावे समोर आले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.























