Chandrakant Patil: पुणे महापालिकेचे दोन भाग करायला हवेत; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चेला उधाण
शहराच्या लोकसंख्येचा आणि आकाराचा विचार केला तर या महापालिकेचे दोन भाग व्हायला हवेत, असं विधान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Chandrakant Patil: पुणे महानगरपालिका ही विस्ताराने देशातील सगळ्यात मोठी महापालिका आहे. त्यामुळे या शहराच्या लोकसंख्येचा आणि आकाराचा विचार केला तर या महापालिकेचे दोन भाग व्हायला हवेत, असं विधान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सध्या पुण्यात अनेक राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
पुण्याचे दोन भाग करण्याची माझी राजकीय भूमिका नाही. मात्र विकास आणि बाकी समस्या बघितल्या तर दोन भाग व्हायला हवेत असं मला वाटतं. जेवढा परिसरत किंवा युनिट जितके लहान असेल तितकं काम करायला सोपं जातं, समस्या नीट सोडवता येतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे लहान क्षेत्रफळात जास्त चांगला विकास होऊ शकतो, असंदेखील ते म्हणाले.
गेल्या काही वर्षात पुणे महापालिकेत 23 नव्या गावांचा समावेश झाली आणि त्यानंतर 11 गावं समाविष्ट झाली होती. त्यामुळे एकूण 34 गावं पुणे महापालिकेत समाविष्ठ झाली. त्यानंतर पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठी महापालिका झाली आहे. त्यामुळे शहरात अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वाहतूक कोंडी, पाणी, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी यावर सातत्याने चंद्रकांत पाटील यांना अनेकदा प्रश्न विचारले गेले. मागील काही वर्ष त्यांनी या शहरातील विकास कामांवर भर दिला. विकास काम करायची असेल तर महापालिकेचं क्षेत्राच्या विकासासाठी दोन भाग व्हायला हवेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
चाळीस लाखाहून अधिक लोकसंख्या
पुणे महानगरपालिकेत 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे लोकसंख्येवर देखील परिणाम झाला आहे. आता सध्या 40 लाखांहून अधिक पुणे शहराची लोकसंख्या आहे. त्यामुळे समस्यादेखील कालांतराने वाढत आहे. महत्वाच्या दोन समस्या सध्या टीकेचा मुद्दा ठरत आहेत. वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्न त्यांचबरोबर अनेक समस्यादेखील तोंड वर काढण्याची शक्यता आहे.
गोवा लहान राज्य असल्याने प्रश्न लवकर सुटतात
गोवा राज्य छोटे असल्याने तिथल्या लोकप्रतिधींचा सर्वांशी वैयक्तिक संबंध येतो. त्यातून प्रश्न लवकर सुटण्यास मदत होते.तिथला मुख्यमंत्री बायकोने सांगितले की मासळी बाजारात जाऊन मासेवाल्याला जाऊन भेटतो. छोटे राज्य असल्याने हे सारे शक्य असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
एकट्या पुण्यात तीन महानगरपालिका
पुणे जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन महापालिका आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानुसार जर पुणे महापालिकेचे दोन भाग झाले तर एकट्या पुण्यात तिसरी महापालिका जन्माला येईल.