मोठी बातमी : पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक स्वबळावर लढणार, भाजप आमदार शंकर जगतापांची घोषणा
Pimpri-Chinchwad Municipal Corporation: पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सर्व राजकीय पक्ष करताना दिसत आहेत, अशातच पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबतची मोठी घोषणा भाजप आमदार शंकर जगतापांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने आम्ही सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेत असणारी महायुती पालिका निवडणुकीत तुटणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगतापांनी हे जाहीर केलं आहे. मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत अजित पवारांचे शिलेदार नाना काटे उपस्थित असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. नाना काटे पालिकेची निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढणार का? अशी चर्चा ही यानिमित्ताने रंगलेली आहे.
नेमकं काय म्हणालेत शंकर जगताप?
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रशासनाच्या माध्यमातून जी काही जनतेची कामे थांबली आहेत, म्हणून आम्ही सर्वजण महानगर पालिकेतील माजी नगरसदस्य शहरातील पाणी, रस्ते, विकास आणि इतर कामांसाठी आयुक्तांकडे आलो होतो. त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, शहरातील सर्वात महत्त्वाचा वाहतूक कोंडीचा मार्ग सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, पाण्याचा आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही गेलो होते. या बैठकीला उपस्थित असलेले सर्वजण सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची कामे करतात. सध्या लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आमच्या या नगरसदस्यांकडे लोक येतात. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही याठिकाणी आलो आहोत, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
महापालिकेच्या किती जागा लढवणार?
महापालिकेच्या किती जागा लढवणार? या प्रश्नावरती बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, शंभर टक्के, सर्व जागा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लढणार आहे, लोकसभा आणि विधानसभेपर्यंत महायुती होती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, स्वबळावरती आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था लढवणार आहोत, मी ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतो, त्या पक्षाचे महानगपालिकेमध्ये आधीपेक्षा देखील आता जास्तीचे नगरसदस्य निवडून आणण्याचा आमचा माणस आहे, असंही शंकर जगताप यांनी म्हटलं आहे.
नाना काटेच्या उपस्थितीतवर काय म्हणाले जगताप?
विधानसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले नेते नाना काटे हे देखील या भाजपच्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीला उपस्थित होते, ते यावेळी भाजपकडून लढणार आहेत का? याबाबतची काही चर्चा झाली आहे का, या प्रश्नावर बोलताना शंकर जगताप म्हणाले, नाही, नाना काटे एक नगरसदस्य म्हणून आलेले होते, ते महायुतीचे घटक देखील आहेत, महानागरपालिकेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्या पध्दतीने होईल. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढणार आहोत, अशी माहिती देखील यावेळी एबीपी माझाशी बोलताना शंकर जगताप यांनी दिली आहे.
दरम्यान शंकर जगताप यांनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यासंबधीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर सर्वच पक्षांनी आगामी पालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. महायुतीतील पक्ष या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, मात्र सत्ता कोणाला मिळणार हे जनता ठरवेल. निवडणुकांच्या कधी घोषणा होतात, त्याकडे लक्ष लागलं आहे.