Gopichand Padalkar : ओबीसी एल्गार मेळाव्यातलं 'हे' वक्तव्य पडळकरांना भोवलं? चप्पलफेक आणि राडा, इंदापुरात नेमकं काय घडलं?
Gopichand Padalkar : इंदापुरात आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी केललं वक्तव्य त्यांना भोवलं.
बारामती : बारामतीमधील (Baramati) इंदापुरात (Indapur) शनिवार 9 डिसेंबर रोजी ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात अनेक ओबीसी नेते (OBC) उपस्थित होते, त्यामध्ये गोपीचंद पडळकर हे देखील नावं होतं. पण हा मेळाव्या संपल्यानंतर इंदापुरात काही काळ राड्याचं स्वरुप पाहायला मिळालं. त्यातच गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या चप्पलफेक देखील करण्यात आली. त्यामुळे या राड्याला उग्र स्वरुप प्राप्त झालं. हा चप्पलफेक मराठा आंदोलकांनी (Maratha Protest) केलीये असा आरोप ओबीसी आंदोलकांकडून करण्यात आला. तसेच मराठा आंदोलकांनी आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतरही ओबीसी समाजाकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत होता.
गोपीचंद पडळकरांचं 'हे' वक्तव्य भोवलं?
ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलं की, तुमच्या जमिनी कोणी घेतल्या, त्या ठिकाणी कारखाने कोणी उभे केले. त्यामध्ये सूतगिरण्या, बँका, कॉलेजं कोणी उभी केली. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कोणी नादवलं कोणी. मराठा समाजाच्या पोरांना भरती केलं ते पैसे कुणी घेतले. ते पैसे घ्यायला तर ओबीसी आले नव्हते. मराठा समाजाने तुमचा सुर्याजी पिसाळ कोण आहे, हे ओळखलं पाहिजे, असं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं. दरम्यान त्यांचं हेच वक्तव्य त्यांना भोवलं असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
सुरुवात नेमकी कुठून झाली?
इंदापुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यात ओबीसी नेत्यांनी मराठा समाजावर अनेक वार केले. या सभेनंतर गोपीचंद पडळकर हे जवळच सुरु असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी दोन आंदोलनं सुरु होती. मराठा समाजाचं साखळी उपोषणही त्या ठिकाणी सुरु होतं तर दूध आंदोलनही त्याच ठिकाणी सुरु होतं. त्यामुळे पडळकर नेमकं कोणत्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडळकरांनी मराठा आंदोलनस्थळी येऊ नये अशा थेट इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. त्यामुळे ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर पडळकर या आंदोलनस्थळी जात असताना त्यांच्यावर चप्पलफेक झाल्याचं प्रकार घडला. दरम्यान ही चप्पलफेक कोणी केली आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
आम्ही चप्पलफेक केली नाही, मराठा समाजाचं स्पष्टीकरण
जेथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याठिकाणी मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरु होते. त्याठिकाणी गोपीचंद पडळकर यांना येण्यास मराठा समाजाकडून विरोध करण्यात आल्या. त्यांना परत जाण्यास मराठा समाजाकडून सांगण्यात आलं. पंरतु आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नाही, चप्पलफेक केली नाही. त्यांच्याच माणसांनी त्यांच्यावर चप्पलफेक केली असल्याचं यावेळी मराठा आंदोलकांनी म्हटलं. त्यामुळे या घटनेमध्ये पोलीसांच्या तपासाअंती संपूर्ण प्रकार उघकीस येईल. तसेच यावर पडळकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.
ओबीसी समाजाकडून इंदापूर बंदची हाक
गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांनीच चप्पलफेक केल्याचा दावा ओबीसी आंदोलकांकडून करण्यात येतोय. दरम्यान या प्रकरणात चौकशीची मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आलीये. तसेच यामध्ये दोषी असलेल्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील ओबीसी समाजाने केली. त्याचसाठी इंदापुरातील संविधान चौकात पुणे सोलापूर मार्गावर ओबीसी समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलं होतं. तसेच जर पडळकरांवर चप्पलफेक ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर सोमवार 11 डिसेंबर रोजी इंदापूर बंदची हाक ओबीसी समाजाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा :
Gopichand Padlakar : गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर इंदापुरात घडली घटना