VIDEO : 'विकासा'च्या आडवं आल्याने मी फक्त त्याला धरायला गेलो आणि तो पडला; बाबूराव चांदेरेंनी झटापटीचं कारण सांगितलं
Baburao Chandere Video : संबंधित व्यक्तीने पोकलेनच्या ड्रायव्हरवर दगडफेक सुरू केली आणि काम थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झटापट झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदेरे यांनी केला.
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदेरे एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. तो व्यक्ती परिसरातील विकासाच्या आडवं आला होता, ठेकेदार आणि इंजिनिअरला धमकावत होता. त्यामुळे त्याला समजवायला गेल्यानंतर झटापट झाली आणि दोघेही पडलो असं बाबूराव चांदेरे म्हणाले.
अजित पवारांचे निकटवर्तीय आणि पुणे स्थायी समितीचे माजी सभापती बाबूराव चांदेरे यांनी विजय रौधळ नावाच्या एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विजय रौधळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला मारहाण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Baburao Chandere Viral Video : विकासाच्या आडवं आल्याने त्याला फक्त धरायला गेलो
बाबूराव चांदेरे यांनी एबीपी माझाला यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "बाणेर परिसरातील लोकांनी ड्रेनेज लाईन असावी अशी मागणी आपल्याकडे केली होती. त्याचे काम सुरू असताना आमच्या इंजिनिअर आणि ठेकेदाराला काम करण्यामध्ये अडथळा निर्माण केला गेला. विजय रौधळने त्यांना धमकी दिली. त्यावर मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे असं मी त्यांना सांगितलं."
बाबूराव चांदेरे पुढे म्हणाले की, "विजय रौधळने हा सगळा बनाव केला होता. काम सुरू असलेल्या ठिकाणी इंजिनिअरला धमकी दिली. त्याने पोकलेनच्या ड्रायव्हरवर दगडफेक सुरू केली. त्यावर ही दगडफेक करणे योग्य नाही अशी विनंती आपण केली. पण तरीही तो ऐकेना. मग विकासाच्या आडवं आल्याने मी फक्त त्याला धरायला गेलो आणि झटापटीत दोघेही पडलो."
बाबूराव चांदेरे म्हणाले की, "आम्ही दोघेही पडलो. पण त्यांच्या डोक्याला दगड लागला. आज या परिसरात त्यांची 100 एकर जमीन आहे. पण प्रत्येकवेळी हा व्यक्ती विकासाच्या आडवं येतोय. दोन कोटींचा रस्ता मंजूर झाला होता. पण जवळपास दोन वर्षांपासून त्यांनी रस्ता करू दिला नाही."
या आधीही बाबूराव चांदेरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोण आहेत बाबुराव चांदेरे?
- तीन टर्म नगरसेवक राहिले आहेत. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.
- 2012 साली पुणे महापालिकेचे स्थायी समिती सभापती.
- कबड्डी क्षेत्रात दिलेले योगदान. गेली 35 ते 40 वर्षाचा असलेला प्रदीर्घ अनुभव. राज्य कबड्डी संघटनेच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी.
- 1986 मध्ये लग्नानंतरच त्यांनी त्यांचे सासरे मारुतराव धनकुडे यांच्यासोबत चांदेरेनी राजकारणात प्रवेश केला. त्यांचे सासरे केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांच्या जवळचे असल्याने बाबूरावांना राजकारण समजलं. काम करत असतानाच चांदेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आले.
- कब्बडीप्रेमी असल्याने त्याने खेळातही मोठे योगदान दिले आहे. सतेज कबड्डी संघाची स्थापना केली. सध्या पुण्यात बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन आणि बाणेर संघ कबड्डी खेळतात.
- त्यांचा मुलगा समीर चांदेरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पुणे शहराचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आहे.