लोणावळ्याजवळ जोडप्याने बांधला दुमजली 'मातीमहल', 700 वर्षांपूर्वीच्या तंत्रज्ञानाचा वापर
पारंपरिक पद्धतीने 700 वर्षांपूर्वीचे तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेलं दोन मजली मातीचं घर तुम्ही कधी पाहिलंय?
Mud House Near Lonavala : अनेक जण आपल्या घराचे इंटेरिअर करतात. वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर घरात ठेवून तसेच वॉलपेपर्स आणि रंग लावून अनेक लोक घर सजवतात. पण पारंपरिक पद्धतीने 700 वर्षांपूर्वीचे तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेलं दोन मजली मातीचं घर तुम्ही कधी पाहिलंय? पुण्यातील एका वास्तुविशारद जोडप्याने नुकतेच केवळ चार महिन्यात 700 वर्षांपूर्वीचे तंत्रज्ञानाचा वापर करून दोन मजली मातीचे घर लोणावळ्याजवळील (Lonavala) वाघेश्वर गावात बांधले आहे.
युगा आखरे (Yuga Akhare) आणि सागर शिरुडे (Sagar Shirude) यांनी हे मातीचे घर बांधले असून त्यांनी हे घर बांधताना बांबू आणि मातीचा वापर केला. या घराला त्यांनी माती महल असं नाव दिले आहे. युगा आणि सागर हे वास्तुविशारद आहेत. त्या दोघांनी हा माती महल जेव्हा बांधण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा पावसाळा होता. अनेकांनी त्यांना पावसाळ्यात बांधकाम न करण्याचा देखील सल्ला दिला, पण युगा आणि सागर त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी हा माती महल उभारण्यासाठी बांबू, लाल माती आणि गवत यांचा वापर केला. सागरने सांगितले, 'चिकणमातीसाठी मायरोबलन वनस्पतीपासून लाल माती, भुसा, गूळ, रस यांचे देशी मिश्रण घेतले. त्यात कडुलिंब, गोमूत्र, शेण मिसळले. जमिनीची तयारी आणि भिंतींना लेप गोमूत्र व शेणाच्या सहाय्याने केले.'
काही महिन्यांपूर्वी आलेल्या तौकते चक्रीवादळाचा या घरावर काही परिणाम झाला नाही. युगा आणि सागर यांनी सांगितले की, 'माती महलचे छप्पर दोन थरांनी झाकलेले आहे. त्यामधील एक थर हा प्लॅस्टिकच्या कागदाचा असून दुसरा हा गवताने तयार करण्यात आला आहे. घराच्या भिंती उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहतात. याला कॉब वॉल सिस्टीम म्हणतात. घराला वेगवेगळ्या वातावरणापासून वाचविण्यासाठी बॉटल आणि डॉव तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ' युगा आणि सागर यांनी पुण्यातून पदवी घेतल्यानंतर 2014 मध्ये सागा असोसिएटस् ही कंपनी सुरू केली. अनेक घरे आणि इमारतींचे डिझाईन त्यांनी केले.
Pune : माजी सैनिकाने पत्नीच्या मदतीने निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी केले प्रयत्न