Pune : माजी सैनिकाने पत्नीच्या मदतीने निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी केले प्रयत्न
सैन्यातून निवृत्त झाल्यावर एका माजी सैनिकाने पत्नीला सोबत घेऊन निसर्ग आणि वन्यजीवांसाठी भगीरथ प्रयत्न केले आहेत.
पुणे : सैन्यातून निवृत्त झाल्यावर एका माजी सैनिकाने पत्नीला सोबत घेऊन निसर्ग आणि वन्यजीवांसाठी भगीरथ प्रयत्न केले आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वनसंरक्षक म्हणून काम करताना रमेश खरमाळे आणि त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे यांनी शिवनेरी किल्ल्यासमोरच्या डोंगरावर साठ दिवसांत तब्बल सत्तर जलशोषक खड्डे खोदून पुर्ण केलेत. तब्बल आठ लाख लीटर पाणी साठवण्याची या खड्ड्यांची क्षमता असून या भागाचा कायापालट होण्यास यामुळे मदत होणार आहे.
ज्या हातांमधे सैनिक म्हणून 17 वर्षे बंदुक पकडली त्याच हातांमधे रमेश खरमाळेंनी निसर्गाच्या ओढीने कुदळ आणि फावडं घेतलं. सैन्यातून निवृत्त होऊन वन विभागात वनसंरक्षक म्हणून नोकरी पत्करल्यावरदेखील त्यांच्यातील सैनिक जागा राहीला. छत्रपती शिवरायांच जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यासमोरच्या डोंगरावर त्यांनी पत्नीला सोबत घेऊन कामाला सुरुवात केली. जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठी असल्यामुळे बिबट्या आणि माणसांमधे वारंवार संघर्ष होताना ते पहात होते.
वन विभागात वनसंरक्षक म्हणून काम करताना या संघर्षाचे मुख्य कारण जंगलांमधे बिबट्यांना अन्न आणि पाण्याची कमतरता जाणवत असल्याने ते मानवी वस्तीकडे वळत असल्याच त्यांच्या लक्षात आलं. शिवाय डोंगर हिरवागार होऊन त्यामधे वन्यजीवांची संख्या वाढायची असेल तर पाण्याची साठवणूक करणं हाच एकमेव पर्याय असल्याच त्यांनी ओळखलं. या कामासाठी रमेश आणि त्यांच्या पत्नी स्वाती दररोज चार वाजता उठून सगळं आवरायचे आणि कुदळ- फावडे घेऊन दुचाकीवरुन डोंगराच्या दिशेनी निघायचे. सोबतीला असायचे ते फक्त गुळ आणि शेंगदाणे आणि प्यायला पाणी. पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत हे पती पत्नी या डोंगराशी अक्षरशः दोन हात करायचे, घामाघूम व्हायचे...पण थोडं पाणी पिऊन, गुळ- शेंगदाणे खाऊन पुन्हा डोंगराला भिडायचे. रमेश खड्डा खणायचे आणि स्वाती माती उपसून बाजुला टाकायच्या.
थंडी किंवा पाऊस काहीही असलं तरी चर खणूनच ते थांबायचे. साडे नऊला काम संपवून ते घरी परतायचे आणि रमेश वन विभागातील आपल्या नोकरीवर तर स्वाती शिक्षिका म्हणून शाळेत कामासाठी पोहचायच्या. या साठ दिवसांत या कामाचा थकवा किंवा कंटाळा येणं तर सोडाच उलट निसर्गाबद्दलची ओढ अधिकाधिक वाढत गेल्याचं स्वाती खरमाळेंना जाणवलं. भारतीय सैन्याच्या मराठा लाईट ईन्फन्ट्रीचा जवान म्हणून रमेश खरमाळेंनी जवळपास सर्व सीमांवर सैनिक म्हणून काम केले आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यावर निसर्गाच्या ओढीने त्यांनी वन विभागात काम करायच ठरवलं.वनसंरक्षक म्हणून काम करताना शिवनेरीच्या परिसरातील आठ गावांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पण वनांच रक्षण करण्याची ही जबाबदारी पार पाडत असताना नव्यानी वनांची निर्मिती करण्याची गरज त्यांना जाणवली आणि एका सैनिकाच्या तडफेने त्यांनी ती पूर्णत्वास न्यायच ठरवलं.
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी असे अनेक सण येऊन गेले. पण रमेश खरमाळेंच्या कामात कुठलाही खंड पडला नाही. दिवाळीतील दहा दिवस वगळता स्वातीही त्यांच्या सोबत डोंगरावर राहत होत्या. या साठ दिवसांत या नवरा बायकोनी मिळून चारशे बारा मीटर लांबीचे सत्तर जलशोषक चर खणून पूर्ण केलेत. ज्यामधे तब्बल आठ लाख लीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. आता या खड्ड्यांच्या भोवती बीयांच रोपन करायचा पुढचा संकल्प त्यांनी सोडला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने या चरांमधे पाणी साठल्याचं पाहून दोघेही धन्य झाले आहेत. पावसाच्या प्रत्येक थेंबात इथं गाळलेल्या घामाचं चीज झाल्यासारखं त्यांना वाटलं. आणि म्हणूनच शिवनेरीसमोरच्या डोंगरावर यशस्वी झालेला हा प्रयोग इथल्या इतर डोंगरावरदेखील राबवायचं त्यांनी ठरवलं आहे.
संबंधित बातम्या
Parth Pawar : मावळ लोकसभेतून पार्थ पवार पुन्हा लढणार, ट्वीटद्वारे दिले संकेत?
Nanded : पुणेरी गोल्डमॅनमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप, कॉफी शॉप उदघाटनावेळी कोरोना नियमांचंही उल्लंघन
Pune Crime : पुणे हादरले; मित्राने 16 वर्षीय मुलासोबत केलं अनैसर्गिक कृत्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha