Anna Hazare : महागाई वाढली, अण्णा हजारे जागे व्हा; राळेगणसिद्धीमध्ये एक जून रोजी आंदोलन
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महागाईत जनता होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
Anna Hazare : आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जनतेच्या प्रश्नावर जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथेच अण्णा हजारेंविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे. झोपी गेलेल्या अण्णा हजारे यांना उठवण्यासाठी 1 जून रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
मागील दोन लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्याशिवाय, महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे. सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही सरकारविरोधात काढला नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंविरोधात 'अण्णा उठो' आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले.
घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची दरवाढ, इंधनासह खाद्यतेलाची होत असलेली दरवाढ, त्यातच खाद्यान्नांची होत असलेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठा आक्रोश असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जनता महागाईत होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे काय आहेत, असा सवालही त्यांनी केला. अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून उठवण्याची आवश्यकता आहे. अण्णा हजारेंनी जनतेसाठी महागाईविरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली नसल्याचा आरोप करण्यात येतो. युपीए-2 च्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अण्णा हजारे आणि इतरांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्याच्या परिणामी काँग्रेस सरकार विरोधात जनमत तयार झाले, असे म्हटले जाते. तर, वाढत्या वयोमानानुसार, प्रकृतीच्या कारणांमुळे अण्णा हजारे आंदोलन करू शकत नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.