Shivsena UBT: ठाकरे गटाचा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर? विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभाला हजेरी; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या
Shivsena UBT: बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने शहरात जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं. ते पिंपरी शहरात परतातच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

पुणे: विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध नियुक्ती झाली. बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने शहरात जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं. ते पिंपरी शहरात परतातच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा झालीच पण, मात्र या कार्यक्रमात ठाकरे गटातील नेत्याने हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. शिवसेना ठाकरे गटातील संजोग वाघेरे यांनी अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली. यावरती फक्त अभिनंदन करण्यासाठी अण्णा बनसोडेंची भेट घेतली असं संजोग वाघेरे म्हणाले आहेत.
काय म्हणाले संजोग वाघेरे?
पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे हे पुन्हा अजित गटाकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. शहराला वीस वर्षानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या रुपाने मोठं पद मिळालं, म्हणून त्यांचं अभिनंदन केलं, यापलीकडे त्या उपस्थितीचा अर्थ काढणं चुकीचं राहील. सध्या माझा तसा काही विचार नसल्याचे वाघेरेंनी म्हंटलं आहे.
अण्णा बनसोडे यांना विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळालं. त्यांना संविधानपद मिळाल्याने 20 ते 25 वर्षांनी शहराला इतकं मोठं पद मिळाल्याने आणि गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्रित काम केल्यामुळे त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी त्यांना भेटलो. त्यावेळी आम्ही शहरात त्यांचं स्वागत केलं. इतकाच हा विषय तिथं झालेला आहे. शिवसेना ठाकरेंच्या पक्षात आहे. पिंपरी शहराचा शहरप्रमपथ म्हणून मी काम करतो आहे. कोणत्या पक्षात जाण्यासाठी माझ्या मनोमध्ये कोणतीही इच्छा नाही. मनात आलंही नाही. ज्या पक्षामध्ये आहे, त्या पक्षात इमानदारीने काम मी करत आहे, असंही पुढे संजोग वाघेरे म्हणाले आहेत.
वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलीच
संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आले होते. मात्र, त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसअगोदर ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा संजोग वाघेरे सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधासभेच्या उपाध्यक्षापदी निवड झाल्यानंतर त्यांचा पिंपरी चिंचवड येथील भक्ती शक्ती येथे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी हजेरी लावली. त्यामुळे वाघेरे हे स्वगृही येणार असल्याची चर्चा सुरू होत्या, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पक्षात असताना पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महत्वाच्या पदे भूषवलेली आहेत.
























