Pune News : कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत 'जरा धीरे चलो'; जड वाहनांना नवी वेगमर्यादा अन्यथा...
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांना आता नवीन वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्यास चालकावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Pune News : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांना आता नवीन वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्यास चालकावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात अपघातांचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवले पुलावर आता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रति तास 60 किलोमीटरवरुन प्रति तास 40 किलोमीटर इतकी घटवण्याची सूचना काढण्यात येणार आहे. तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सरासरी 300 वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.
या ठिकाणी असलेले काही हॉटेलचालक आणि अन्य व्यावसायिक मुख्य मार्ग आणि सेवा रस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांनी या सूचना केल्या आहेत.
जड वाहनांची वेगमर्यादा 40 किमी प्रतितास करणार
कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा 60 किमीवरुन 40 किमी प्रतितास इतकी घटवण्याची अधिसूचना तात्काळ काढण्याचे निश्चित करण्यात आले. खेड शिवापूर पथकर प्लाझा येथे सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी सतत उद्घोषणा करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. या रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्यासाठी इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण (एक्झिट रॅम्प) तयार करण्याबाबत पाहणी केली जाणार आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती
सर्व शासकीय कार्यालयात दुचाकीने येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी परिवहन विभाग तसेच पोलिसांनी संयुक्तपणे जनजागृती करावी. 'एक दिवस डोक्यासाठी' अशा स्वरुपाची मोहीम राबवत हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रबोधन तसेच दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करावेत, असेही ते म्हणाले.
प्रत्येक कॅमेरा सॉफ्टवेअरशी जोडा...
वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनासाठीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असून ते पोलीस विभागाच्या सॉफ्टवेअरशी जोडावेत, जेणेकरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
