(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Dhangekar On Nikhil Wagle Attack : मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आणू नका, निखिल वागळेंच्या गाडीवरील हल्ला पोलिसांच्या संगनमताने; आमदार रविंंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुद्यांची लढाई गुद्यांवर आणू नये, हा हल्ला पोलिसांच्या संगनमताने केला, असा आरोप त्यांनी केला आहे.
पुणे : पत्रकार निखिल वागळेंच्या ((Nikhil wagle Car Attack) गाडीवर हल्ला करण्यात आला. राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भय बनो (Nirbhay Bano) या कार्यक्रमाला निखिल वागळे वक्ते होते. या कार्यक्रमासाठी येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात हल्ला करण्यात आला. निखिल वागळेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Naremdra Modi) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि हल्ला केला. या प्रकरणावर आता कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, शाईफेक करण्याची घटना लोकशाहीची हत्या असल्याचं ते म्हणाले. भाजपने आपली भूमिका मांडावी, निषेध करावा पण गुंडगिरी करुन आणि महिलांवर हल्ला करुन त्यांनी आपली भूमिका मांडू नये ही साफ दडपशाही आहे. मुद्यांची लढाई गुद्यांवर आणू नये, हा हल्ला पोलिसांच्या संगनमताने केला, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
रविंद्र धंगेकर म्हणाले की, काल निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली. हा हल्ला लोकशाहीची हत्या करणारा आहे. तुम्ही तुमची भूमिका, निषेध मांडा मात्र अशी गुंडगिरी करून, महिलांवर हल्ला करून आपली भूमिका मांडू नका. हा प्रकार प्रचंड निंदनीय आहे. भाजपचे पदाधिकारी हे काल चुकीचं वागले आहेत. त्यासोबत पोलिसांनीदेखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्यांना पाठिशी घालण्याचं काम केलं आहे. आपले विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण मुद्याची लढाई गुद्यांवर आणू नये. आपला देश हुकूमशाहीकडे चालला आहे. लोकशाहीला कुठेही थारा दिसत नाही, अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे.
पोलिसांच्या मदतीने हल्ला केला...
सगळ्या यंत्रणा भाजपच्या बांधिलकी मानतात. पोलिसांनी काल सगळ्यांना दिलेली वागणूक अत्यंत चुकीची आहे. चार तास वागळेंना डांबून ठेवलं आणि सभेला निघताच सगळे कार्यकर्ते रस्त्यांवर उभे ठेवले होते. पोलिसांनी त्यांना वागळेंसंदर्भात माहिती दिली आणि पोलिसांच्या संगनमताने वागळेंवर हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर अनेक कार्यकर्ते पोलिसांंना दिसत होते मात्र पोलिसांनी त्यांना निघून जाण्याचे आदेश देणं अपेक्षित होतं. याच जागी विरोधीपक्षाचे कार्यकर्ते असते तर लाठीचार्ज करण्यात आला असता, असंही ते म्हणाले. या प्रकरणी मी स्वत: अजित पवारांची भेट घेणार आहे. अजित पवार असे वागत नाही. कालच्या हल्ल्यात त्यांचे कार्यकर्ते होते. यामुळे अजित पवारांची आणि कार्यकर्त्यांची प्रतिमा बदलली असल्याचंही ते म्हणाले.
फडणवीस विरोधकांना कुत्र्याची उपमा देतात?
देवेंद्र फडणवीसांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारावरुन विरोधकांनी फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला होता. त्यानंतर आता रविंद्र धंगेकर यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गृहमंत्री म्हणतात श्वान गेलं तरी राजीनामा मागतील. ही लोकशाही आहे, त्यातील लोक राजीनामा मागतात आणि तुम्ही त्यांना कुत्र्याची उपमा देतात? हे चुकीचं आहे. ही लोकशाही नाही, दडपशाही झाली आहे.
इतर महत्वाची बातमी-