Pune Flood Update : पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली
Pune Flood Update : पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सहाय्यक महापालिका आयुक्ताचे निलंबित करण्यात आले आहे. तर परिमंडळ तीनच्या उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे.
Pune Flood Update : पुण्यातील पूरपरिस्थिती (Pune Flood) हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सहाय्यक महापालिका आयुक्ताचे निलंबित करण्यात आले आहे. तर परिमंडळ तीनच्या उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश काल (शनिवारी) जारी केले आहेत. संदीप खलाटे असे निलंबित केलेल्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांचे नाव असून परिमंडळ तीनचे उपायुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आलेली आहे. खलाटे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून, ती चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे परंतु त्यांना नवी नियुक्ती देण्यात आली नाही.
सिंहगड रोड पूरग्रस्त भागात कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना (Pune Flood) सोयीसुविधा पुरविल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांबरोबरच उपायुक्त संजय शिंदे यांचाही पदभार काढून घेतला आहे. गुरुवारी मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले होते. त्याचा मोठा फटका परिसरातील नागरिकांना बसला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गुरुवारी पहाटे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने सिंहगड रस्ता परिसरासह मुठा नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. याबबातची कोणतीही पुर्वसूचना न दिल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला होता. त्यामुळे नदीकाठ परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. सोसायट्या, घरे, दुकाने, बाजारपेठा, वस्त्यांमध्ये, पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले. एबीपी माझाने सिंहगड परिसरातील एकता नगर, निंबजनगर, विठ्ठलनगर या पुरबाधित परिसरातील घटनेची संपूर्ण आढावा घेतला होता.
पुरस्थिती ओसरल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून योग्य पद्धतीने मदत मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी एबीपीकडे देखील केली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) यांनीही विठ्ठलनगर परिसरात पाहणी केली, त्यावेळी पुरबाधित परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ, कचरा व अस्वच्छता असल्याचे त्यांना दिसून आले. या भागाचे संदीप खलाटे हे या क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक होते. याला जबाबदार धरत त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त डॉ. भोसले यांनी खलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.