(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Car Accident: फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर
Pune News: पुण्यातील अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट. ससूनच्या डॉक्टरांकडून आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल. डीएनए टेस्टमध्ये बिंग फुटलं. सात दिवस होऊनही ब्लड रिपोर्ट मिळत नव्हते, तेव्हाच आम्हाला संशय आला.
पुणे: पुणे अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर हे अपघात प्रकरण (Pune Road Accident) सातत्याने उचलून धरणारे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत. कल्याणीनगरमध्ये ज्या रात्री हा अपघात झाला त्या रात्री केवळ ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले, असे धंगेकर यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, यावरुन आता राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
रविंद्र धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा सात दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा, आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो,हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. जे आता हळू हळू जगासमोर येईल, असे रविंद्र धंगेकरांनी म्हटले आहे.
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 27, 2024
ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत…
पुणे पोलिसांकडून ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. अग्रवाल कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी या दोघांना पैशांचे आमिष दाखवले. विशाल अग्रवाल याने अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती कॉल डिटेल्समधून समोर आली आहे. त्यानंतर या दोघांनीही अल्पवयीन मुलगा अल्कोहोल टेस्टमध्ये निर्दोष ठरावा, यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी एका दुसऱ्याच रुग्णाच्या रक्ताचे सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबकडे दिले. पुणे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल. या दोघांनाही आता सोमवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल.
आणखी वाचा