Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : पुण्यातील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनात नाट्यमयी घडामोडी, ऐनवळीस पवार काका-पुतण्याच्या कार्यक्रमात बदल
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार दोघेही गैरहजर राहिले.
मुंबई : शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) शुभारंभाचा सोहळा पुण्यात (Pune) आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमात अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. या शुभारंभ सोहळ्याला शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अचानक आयोजकांना शरद पवार उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं. पण अजित पवार देखील या शुभारंभाच्या सोहळ्याला हजर राहिले नाहीत. त्यामुळे पाच वाजता सुरु होणार हा सोहळा सात वाजले तरीही सुरु झाला नव्हता.
या कार्यक्रमास शरद पवार आणि पालकमंत्री म्हणून अजित पवार या दोघांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. पण आज सकाळी अजित पवार यांनी आपल्याला या शुभारंभ सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याचं म्हटलं. त्यानंतर शरद पवारांनी अचानक नाट्य संमेलनाच्या या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळेस अजित पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचं ठरवलं.
काका पुतणे एकाच मंचावर येणार असल्याच्या चर्चा
नाट्यसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे काका पुतणे एकाच मंचावर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याआधी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. पण आजच्या कार्यक्रमाला दोघांनीही गैरहजर राहणं पसंत केलं. त्यामुळे सुरु असलेल्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला.
पुण्यात 100 व्या नाट्यासंमेलनाचं आयोजन
100 व्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) नाट्यकर्मी आतुरतेने वाट पाहत होते. कोरोनामुळे रखडलेल्या शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ अखेर करण्यात आलाय. शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे 2024 मध्ये रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.
नाट्यसंमेलन कसं असेल? (Natya Sammelan Schedule)
5 जानेवारी 2024 - पुण्यात शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ
6 जानेवारी 2024 - पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार
7 जानेवारी 2024 - विविध कार्यक्रमांचे आयोजन (महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार)
हेही वाचा :