(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : पुरंदरच्या शेतकऱ्यानं माळरानावर फुलवले नंदनवन, फळबागांसह तरकारी पिकांचा यशस्वी प्रयोग
Agriculture News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.
Agriculture News : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी (Farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल उत्पादन घेत आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. गोपाळ कदम (Gopal Kadam) यांनी डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
फळबागांसह कारले, घेवडा, कांदा पिकाचे उत्पादन
गोपाळ कदम हे 1986 साली पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी बँकेत काम करण्याची संधी मिळाली होती पण नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची एकदाही शेती तोट्यात गेली नाही. गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे. सोबतच तरकारी मालामध्ये कारले, घेवडा, कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील त्यांनी घेतलं आहे.
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरीच सेंद्रिय निविष्ठा केली तयार
गोपाळ कदम यांनी वयाच्या 20 व्या वर्षी शेती करण्याचा निर्णय घेतला. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना बँकेत नोकरी लागली होती. परंतू त्यांना शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. गोपाळ कदम यांनी शेती करताना सरकारी योजनांचा लाभ घेतला. त्याचा फायदा त्यांना शेतीत झाला. जसजशी वर्ष सरत गेली तस तसा शेतीचा उत्पादन खर्च वाढत गेला. त्यामुळं शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम यांनी सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम हे घरीच सेंद्रिय निविष्ठा तयार करतात. यामुळं त्यांच्या खर्चात बचत होते.
आप्पासाहेब पवार यांनी बारामतीत शेतीत केलेले प्रयोग पाहून शेती करण्याचा निर्णय
आमच्याकडे वडिलोपार्जित शेती होती. माझे वडील चांगले शेती करत होते. पण त्यावेळीची शेती ही पारंपारिक आणि कोरडवाहू शेती होती. मी कॉलेजला असताना आमची बारामतीला सहल गेली होती. तिथे दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी शेतीत चांगले प्रयोग केले होते. मी देखील तशाच पद्धतीनं शेती प्रयोग करायचा निर्णय घेतला. शेतीला चांगले दिवस येतील या दृष्टीकोणातून मी शेती करु लागल्याचे गोपाळ कदम यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: