Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, असं म्हटलं. राज्य सरकारनं योजना सुरु करताना महिलांना दरमहा 1500 रुपये दिले होते. त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आज या निमित्तानं सभागृहाला आश्वस्त करु इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका, जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत.ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, एकही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जनतेचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे?
काही जणांनी चार चार खाती उघडली आहेत, असं लक्षात आलं आहे. समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात , तशा काही वाईट प्रवृत्ती असतात. एखादी योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची जबाबदारी आहे. तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. माणसांनीच 9 खाती काढलीत त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचं, लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही. बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात, ज्येष्ठांच्या संदर्भात, वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 की 2100 रुपये मिळणार?
महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयांप्रमाणं रक्कम मिळू शकेल. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली आहे. त्यामुळं महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा 1500 रुपये मिळतील.
इतर बातम्या :