Eknath Shinde, Aditya Thackeray In Pune: एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पुण्यात आमने-सामने? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
एका शहरात, एकाच दिवशी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने येणार असल्याची शक्यता आहे. हे आमने-सामने आल्यावर नेमकं काय होणार?, याकडे दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.
Eknath Shinde Aditya Thackeray In Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) पुणे दौऱ्यावर आहे. त्यासोबतच शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya thackeray) देखील पुणे दौऱ्यावर आहेत. एका शहरात, एकाच दिवशी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने येणार असल्याची शक्यता आहे. हे आमने-सामने आल्यावर नेमकं काय होणार?, याकडे दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यासाठी संध्याकाळी आदित्य ठाकरे पुण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदेंची पहिलीच सभा पवारांच्या बालेकिल्ल्यात
एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर (purandhar ) तालुक्याच्या सासवड होणार आहे. पवारांच्या बालेकिल्यात पहिली सभा होणार असल्याने सगळीकडे चर्चेला उधाण आलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक समस्या जाणू घेणार आहेत. त्यात पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न देखील महत्वाचा असणार आहे. या सभेला शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदार संघात ही सभा असल्याने सभेची चांगलीच चर्चा होत आहे.
एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमने-सामने?
एकनाथ शिंदे सायंकाळी 7 वाजता पुण्यातील कात्रज चौकात आमदार तानाजी सावंत यांच्या घरी भेट देणार आहेत.आदित्य ठाकरे पुण्यातील कात्रज येथे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत, त्याचवेळी मुख्यमंत्री येथे उपस्थित राहणार आहेत. ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे.
शिवसेना नक्की कोणाची?
शिवसेना नक्की कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची? असा वाद सुरु आहे. मात्र हे सगळं निवडणूक आयोगाला ठरवू द्या, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. यावर शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर 3 तारखेला सुप्रीम कोर्टात प्रकरणावर सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाशी संबंधित प्रश्नावर सुनावणी न घेण्याची विनंती एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.सुनावणीच्या एक दिवसा आधी दोघेही आमने-सामने येणार असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.