Pune Crime News: अंगावर काटा आणणारी घटना! स्कूलबस चालकानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
बसचालकाने पीडित मुलीला रिलेशनशिपमध्ये राहणार का? विचारले. त्यावेळी तिने उत्तर न दिल्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. जुन्या इमारतीत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Pune Crime News: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर चक्क स्कुलबसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडल्याने संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. घडलेल्या प्रकाराबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. गेले अनेक वर्ष ती या बसमधून शाळेचा प्रवास करत होती. स्कूलबस चालक आणि पीडित मुलगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यासोबत रोज शाळेत जावं लागत असल्याने अनेकदा गंमत चालायची. बसचालकाने पीडित मुलीला रिलेशनशिपमध्ये राहणार का? असं विचारले. त्यावेळी तिने उत्तर न दिल्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगातून तिने सुटण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न सफल झाला नाही. काही वेळानंतर त्या स्कूलबस चालकाने तिला जबरदस्तीने जुन्या इमारतीत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. लैंगिक अत्याचार आणि पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकांमध्ये भीतीचं वातावरण
अनेकदा अशा प्रकरणावरुन पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या मुलीवरील लैंगिक अत्याचाराची माहिती कळल्यावर पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सध्या शहरात अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फोटो मॉर्फिंग आणि सोशल मीडियाची भीती दाखवून प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला जातो.त्यामुळे या संदर्भातील अनेक प्रकरणं पुढे येत नाही. जवळच्या ओळखीच्या लोकांवरच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र या अत्याचाराचं प्रमाण रोखण्याची गरज आहे. जोपर्यंत या नराधमांना शिक्षा होत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाही.
यापुर्वी डॉक्टरजातीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली होती. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता . या डॉक्टरने पीडित तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली होती.























