Pune Shivsena : तोच जल्लोष, तोच उत्साह; पुण्यातून 5000 शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल
शिवसेना पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वात जवळपास 5000शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने मुंबईला आलो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
Pune Shivsena : मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा (Dasara Melava) मेळावा होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसैनिकांकडून जय्यत तयारी केली आहे. जवळपास 5000 शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने मुंबईला आलो आहोत. खरी शिवसेना कोणाची हे कधी ठरेल माहीत नाही मात्र बाळासाहेबांचीच शिवसेना खरी आहे. त्याचे विचार ऐकण्यासाठी पुण्यातून मुंबईत आलो आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे.
यात अनेक महिलांचा देखील समावेश आहेत. शिवाजी पार्कवर पुण्यातील महिला देखील दाखल झाल्या आहेत. मोठ्या घोषणा देत महिलांनी जल्लोष साजरा केला आहे. मुंबईला निघायच्या आधी पुण्यात शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती.
दरसा मेळाव्यासाठी शिवसेनेला तयारी करण्याची गरज लागत नाही. मेळावा आमच्यासाठी पर्वणी असते. 1966 पासून हा मेळावा सलग सुरु आहे. आमच्यापुर्वी असलेल्या जेष्ठ शिवसैनिकांनी या मेळाव्याला जाण्याची सुरुवात केली होती आणि आम्ही ती परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे या मेळाव्यासाठी फार तयारी करावी लागणार नाही. दरवर्षीपेक्षा यंदा दोन वर्षांनी होणारा हा मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे, त्यामुळे त्यासाठी आम्ही उत्सूक आहोत, अशी भावना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी व्यक्त केली आहे.
यात महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना यांच्याबरोबरच आपल्यातील सगळ्यात तरुण असलेले जेष्ठ शिवसैनिकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. शरिराने जरी थकले असले तरी शिवसेनेची सेवा त्याचं कार्य करण्यासाठी ते थकले नाहीत. तेच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनता ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे आणि मेळाव्यात सहभागी झाले आहे, असंदेखील ते म्हणाले.
अनेकांचा पहिल्यांदाच मेळाव्यात सहभाग
पुण्यातील काही युवा सेना आणि युवती सेनेचे अनेक तरुण या दसरा मेळाव्यात सहभागी होणार आहे. त्यामुळे त्यांचा देखील उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. 1966 पासून मेळाव्याला जाणारे शिवसैनिक आणि पहिल्यांदा मेळाव्याला जाणारे शिवसैनिक एकत्र या मेळाव्यात हजेरी लावणार आहे.
महाराष्ट्रभरातून शिवसैनिक दाखल
कट्टर शिवसैनिक पुणे, ठाणे, तुळजापूर, नाशिक, औरंगाबाद या सगळ्या शहरातून शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. अनेक शिवसैनिक आपल्या शहरातून पायी चालत देखील त्यांनी शिवाजी पार्कात हजेरी लावली आहे.