(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Ganeshotsav 2022: दोन वर्षांनी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी महापालिका तयार; विसर्जनासाठी 150 फिरते हौद उभारणार
घनकचरा व्यवस्थापन विभागाने उत्सवाच्या कालावधीत 150 फिरते हौद बांधण्याचा निर्णय घेतला आहे. फिरत्या विसर्जन हौदांसह नागरी संस्था विसर्जनासाठी 135 निश्चित हौदांची सोय करण्यात येणार आहे.
Pune Ganeshotsav 2022: कोरोनानंतर दोन वर्षांनी पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून (पीएमसी) आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने उत्सवाच्या कालावधीत 150 फिरते हौद बांधण्याचा निर्णय घेतला आहे. फिरत्या विसर्जन हौदांसह नागरी संस्था विसर्जनासाठी 135 निश्चित हौदांची सोय करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात दीड दिवस, पाच, सात आणि दहा दिवसांचे गणेश विसर्जन केले जाते. त्यानुसार महापालिकेने विसर्जन तलावांच्या बांधकामाचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी फिरत्या विसर्जन टाकीची संकल्पना राबविताना वाहने घटनास्थळी थांबवूनही अनेकांनी पैसे देत विसर्जन केल्याची घटना घडली होती. यंदाही अशा घटना घडू नयेत, यासाठी काळजी घेतली जाईल, असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.
यंदा घनकचरा विभागाकडून 150 फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पंधरा झोन कार्यालयातून स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातही ठिकठिकाणी विसर्जन तलाव बांधण्यात येणार आहेत. यंदा शहरातील विविध भागात 136 ठिकाणी विसर्जन तलाव बांधण्यात येणार आहेत. निश्चित केलेल्या टाक्यांची स्वच्छता, रंगरंगोटी, दिवाबत्ती या सगळ्यांसाठी खर्चास मान्यता दिल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
यंदा शेवटचे 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी
दरवर्षी शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर लावायची परवानगी असते मात्र यावर्षी त्यात एक दिवस वाढवण्यात आला आहे. यावर्षी पाच दिवस लाऊडस्पीकरला परवानगी असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केली आहे. पोलीस आयुक्त आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री काल पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
गणेश मंडळांसाठी काही निर्णय घेण्यात आले. त्या मंडपाचं शुल्क माफ केलं आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना परवानग्यांसाठी फार त्रास होऊ नये यासाठी स्वतंत्र खिडकीचं नियोजन, ऑनलाईनसुद्धा परवानगी याचा समावेश आहे. त्यामुळे गणेश मंडळांना त्रास होणार नाही याचीदेखील काळजी घेण्याचं योग्य नियोजन केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.