अमेठी सोडून राहुल गांधींना रायबरेली मतदारसंघ का निवडला? काय आहे रायबरेलीचा इतिहास?
Political History Of Raebareli Lok Sabha Election : उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून आतापर्यंत गांधी परिवाराने सातत्याने विजय मिळवल्याचा इतिहास आहे. आताही राहुल गांधी यांनी अमेठी सोडून रायबरेलीचा सुरक्षित रस्ता धरला आहे.
मुंबई : राहुल गांधींची (Rahul Gandhi) उमेदवारी अखेर उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून (Raebareli Lok Sabha Election) जाहीर करण्यात आलेली आहे. वायनाडसह अजून एखाद्या मतदारसंघातून राहुल गांधी लढणार का या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस निवडणूक समितीकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पहाटे जाहीर करण्यात आले आणि राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघातून अर्ज भरला सुद्धा. अमेठीऐवजी राहुल गांधींनी रायबरेलीची निवड का केली, प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा रायबरेली मतदारसंघासाठी सुरु होती मग अचानक राहुल गांधींचे नाव कुठून आले असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
अखेरच्या क्षणी रायबरेलीची निवड
उत्तर भारतातल्या कुठल्यातरी मतदारसंघातून गांधी घराण्यातील कोणीतरी लढलं पाहिजे ही काँग्रेसची राजकीय गरज राहुल गांधींनी पूर्ण केली आहे. पण त्यासाठी स्वतःच्या अमेठी मतदारसंघाची निवड न करता राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ निवडला आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघातून अर्ज भरला. रायबरेली मतदारसंघातून प्रियंका गांधींच्या नावाची चर्चा सुरु होती, तर अमेठीतून राहुल गांधींच्या नावाची. पण अखेरच्या क्षणी राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ निवडला.
रायबरेलीचा इतिहास काय?
रायबरेली मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जातो. या मतदारसंघात गांधी घराण्याच्या व्यक्तींचं वर्चस्व असल्याचं दिसतंय.
1952 साली फिरोज गांधी रायबरेलीचे खासदार होते.
1957 -आर पी सिंग
1962 - बैजनाथ कुरील
1967 - इंदिरा गांधी
1971 साली इंदिरा गांधी रायबरेलीच्या खासदार राहिल्या. पण आणीबाणीनंतर झालेल्या 1977 च्या निवडणुकीत राज नारायण यांनी इंदिरा गांधींचा रायबरेलीतून पराभव केला.
1980 साली पुन्हा इंदिरा गांधी रायबरेलीच्या खासदार झाल्या.
1984 - अरुण नेहरु
तर 1989 आणि 1991 साली शीला कौल रायबरेलीतून निवडून आल्या.
1996 साली भाजपचे अशोक सिंग तर 1998 आणि 1999 साली काँग्रेसचे सतीश शर्मा रायबरेलीचे खासदार झाले.
2004 पासून 2019 पर्यंत सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार राहिल्या.
त्यामुळं रायबरेली हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला कायमच कौल मिळाला यामागे तिथलं जातीय समीकरणही कारणीभूत आहे
रायबरेलीतील जातीय समीकरण-
रायबरेलीत 11 टक्के ब्राह्मण आहेत.
ठाकूर 9 टक्के
यादव - 7 टक्के
तर अनुसूचित जातीची संख्या तब्बल 34 टक्के आहे.
मुस्लिम - 6 टक्के
लोध समाज - 6 टक्के
कुर्मी - 4 टक्के
तर इतर समाज 23 टक्के आहेत.
राहुल गांधी आता केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत. गेल्या वेळी अमेठीतून पराभव झालेल्या राहुल गांधींना वायनाडने तारलं होतं. आता रायबरेलीतून अर्ज भरलेले राहुल गांधी लोकांच्या पसंतीस पडतात का हे 4 जून रोजीच कळेल.
ही बातमी वाचा :