Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांनी जेवणाच्या ताटावर मविआच्या नेत्यांना मनातली खंत बोलून दाखवली, बैठकीत नेमकं काय घडलं?
Mahaviaks Aghadi and VBA Alliance talk in Mumbai: मी आघाडीसोबत आहे, पण आघाडी माझ्यासोबत नाही! प्रकाश आंबेडकरांनी जेवता-जेवता मविआ नेत्यांना मनातली खंत बोलून दाखवली. या बैठकीला प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे दोन सहकारी उपस्थित होते.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईच्या 'फोर सिझन्स' हॉटेलमध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मविआचे महत्त्वाचे नेते आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे उपस्थित होते. या बैठकीत घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे (Siddharth Mokle) हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. त्यांनी म्हटले की, या बैठकीत एक वेळ अशी आली होती की, सगळ्या नेत्यांकडे बोलण्यासाठी काही उरले नव्हते, ही चर्चा थांबल्यासारखी झाली होती. त्यानंतर जेवणासाठी ब्रेक झाला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जेवताना आपल्या मनातील खंत मविआच्या नेत्यांना बोलून दाखवली. मी महाविकास आघाडीसोबत (Mahaviaks Aghadi) आहे, पण आघाडीच माझ्यासोबत नाही, असे मला वाटते, असे आंबेडकर यांनी म्हटले. बाळासाहेबांचे ते वाक्य माझ्या मनाला खूप लागले, असे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले.
सिद्धार्थ मोकळे यांच्या सांगण्यानुसार आजच्या बैठकीत वंचितला अपेक्षित असलेल्या बहुतांश मुद्द्यांवर चर्चा झालीच नाही. आम्ही यापूर्वी अचर्चित असलेले मुद्दे आज बैठकीवेळी पुढे आणले, पण त्यावर आज चर्चा होऊ शकले नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल मविआची भूमिका काय, यावर चर्चा होऊ शकली नाही. आपण 15 ओबीसी आणि 3 अल्पसंख्याक उमेदवार दिले पाहिजेत, असा वंचितचा प्रस्ताव मांडला होता. त्यावरही बैठकीत चर्चा होऊ शकली नाही. तसेच मविआचा भाग असलेला कोणताही पक्ष निवडणुकीनंतर भाजपसोबत समझोता करणार नाही, याच लेखी आश्वासन द्यावे, हा मुद्दाही बाळासाहेबांनी बैठकीत मांडला. परंतु, त्यावर मविआच्या सर्व नेत्यांनी मौन धारण केले होते, असे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, हवं तर मी अकोल्याची जागा देतो....
मविआ आणि वंचितच्या बैठकीत दोन्ही बाजूचे प्रमुख नेते उपस्थित असूनही लोकसभेच्या जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. वंचितने मविआसमोर 27 जागांचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, त्यावरही मविआने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीत म्हटले की, हवंत तर मी अकोल्याची जागा द्यायला तयार आहे. पण तुम्ही बोला. पहिल्या बैठकीपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी मविआकडे आम्हाला कोणत्या आणि किती जागा देणार, याबद्दल विचारणा करत आहेत. परंतु, मविआने अद्याप त्याबाबत काहीच सांगितलेले नाही. आजच्या बैठकीतही मविआ आम्हाला कोणत्या जागा देणार, याबद्दल काहीच चर्चा झाली नाही. आता मविआच्या नेत्यांनी आणखी वेळ मागून घेतला आहे, असे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.
आणखी वाचा