Vasant More : मी परतीचे दोर स्वत: कापले, पुणेकर माय-बाप समजून घेतील, वसंत मोरे ढसाढसा रडले!
Vasant More Resignation : ताकद असूनही मला निवडणूक लढवून दिली नाही, पोस्ट टाकल्यानंतर रात्रभर झोपलो नाही असं सांगत वसंत मोरेंनी आपली भूमिका सांगितली.
पुणे : मनसेसाठी पुण्यामध्ये एवढं चांगलं वातावरण असतानाही मला लोकसभा निवडणूक लढवू दिली नाही, पक्षासाठी एकनिष्ठ राहिलो पण काही लोकांनी चुकीचे अहवाल दिले असा आरोप करत वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या आधीही मी वेळोवेळी राज साहेबांकडे याची तक्रार केली होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही असंही ते म्हणाले. मी या आधी एकनिष्ठतेचा कळस केला, आता राजीनामा देऊन परतीचे दोर स्वतः कापले असं सांगताना वसंत मोरे ढसाढसा रडल्याचं दिसून आलं.
ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण असूनही या ठिकाणी निवडणूक लढवू दिली नाही असा आरोप वसंत मोरे यांनी केला. 2012 ते 2017 या काळात पुणे मनपामध्ये मनसे हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, मी विरोधी पक्षनेता होतो, त्यावेळीही मोठी ताकद असताना लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण केल्याचं ते म्हणाले. राज ठाकरे यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नसल्याचंही ते म्हणाले.
निवडणुकीबाबत नेत्यांची नकारात्मक भूमिका
पुण्यात ताकद असतानाही आपल्याला निवडणूक लढवू दिली नाही, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे चुकीचे अहवाल पाठवण्यात आल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला. निवडणूक लढवणे हा माझा गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी विचारला.
वसंत मोरे म्हणाले की, वसंत मोरे हा खासदार होऊ शकतो असं मी सांगितलं होतं. पण वसंत मोरे हा स्वकेंद्रीत राजकारण करतोय असं वरिष्ठांना सांगितलं गेलं. मी गाऱ्हाने मांडलं होतं, त्यावर माझ्यावरच कारवाई झाली. मग आता वाटतंय की मी राजीनामा दिला पाहिजे.
राजीनामा दिल्यावर फोन आले (Vasant More Facebook Post)
मी काल रात्रभर झोपलेलो नाही, मी काल रात्री पोस्ट केली पण त्यावर कुणीही विचारलं नाही. आता राजीनामा दिल्यानंतर यांचे फोन आले असं वसंत मोरे यांनी सांगितलं. माझ्याबद्दल वरिष्ठांकडे चुकीचे अहवाल देण्यात आले. आता मी लोकसभा लढवणार नाही. राज ठाकरेंनी जे चार लोक इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी द्यावी.
पुणेकर ठरवतील वसंत मोरेने काय करायचं ते
मी राजीनामा दिलो असलो तरी कोणत्याही पक्षात जाणार नाही, पुणेकर ठरवतील वसंत मोरेने काय करायचं असं ते म्हणाले. मी माझ्या घरातील पहिला राजकारणी असून मला कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे पुणेकरांनी ठरवलं तर मी त्यांच्यासाठी 100 टक्के लढणार असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं.
Vasant More PC Pune Video : वसंत मोरे यांची पत्रकार परिषद
ही बातमी वाचा: