(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : दादा धंद्यामध्ये हुशार,'उत्तम' पैदाशीची जनावरं घ्यावी, जानकर अजितदादांवर कडाडले
Ajit Pawar : गोरगरीब बहुजनांच्या राजधानी बारामतीला संपवायचा हात घातला तेव्हा महाराष्ट्रात उद्रेक झाला आणि बारामतीत सुद्धा अजित पवारांवर सपाटून मार खावा लागला असे महादेव जानकर म्हणाले.
सोलापूर : जे लहान मुलाला कळते ते अजित पवार यांना काळात नाही, म्हणजेच ते राज्याचे काय बारामतीचे देखील नेते होऊ शकत नाहीत . अजित पवार कधीचे नेते नव्हते, त्यांच्यात ते गुणचं नाहीत, फक्त शरद पवार यांच्या पोटी पुत्र नसल्याने त्यांच्याकडून मिळालेली जहागिरी ही फितुरीने दुसऱ्याला विकायची हे भयानक मोठे पाप अजितदादांनी (Ajit Pawar) केले असल्याची सणसणीत टीका उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी केली.
ऐन निवडणुकीत अजितदादा यांची साथ सोडून उत्तम जानकर यांनी माढा , सोलापूर आणि बारामतीमध्ये जोरदार प्रचाराची राळ उडवत धनगर समाजाची मोठी ताकद राष्ट्रवादी शरद पवार यांच्यामागे उभी केली होती . त्यामुळे माढा , सोलापूर आणि बारामती या तीनही जागा महायुतीच्या हातून गेल्या होत्या. या संपूर्ण निवडणुकीत उत्तम जानकर यांनी त्यांच्याच पक्षात राहून उघडपणे अजितदादा यांना थेट आव्हान दिले होते. मात्र उत्तम जानकर यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस अजूनही अजितदादा गटाने दाखवलेले नाही . गेल्या महिनाभर उत्तम जानकर यांनी जाहीर सभेतून वेळोवेळी अजितदादा यांची खिल्ली उडवूनही त्यांना दादा गटाकडून कधीही उत्तर देण्यात आलेले नाही . एवढ्या टोकाच्या टीकेनंतर देखील राष्ट्रवादीचे सर्व प्रवक्ते बघ्याच्या भूमिकेत आहेत . आता या नवीन टीकेला तरी अजितदादा यांचेकडून काही उत्तर मिळते का हेही पाहावे लागणार आहे.
बारामतीला संपवायचा हात घातला तेव्हा महाराष्ट्रात उद्रेक झाला :उत्तम जानकर
महायुतीचा दारुण पराभव झाल्यावर पुन्हा एकदा अजित पवारांवर उत्तम जानकर यांनी तोफ डागली असून अजितदादांनी आधीच फितुरीने 40 गड दिले आणि थेट पवार साहेबाना संपवायला निघाले होते असा टोला लगावला. पण ज्यावेळी गोरगरीब बहुजनांच्या राजधानी बारामतीला संपवायचा हात घातला तेव्हा महाराष्ट्रात उद्रेक झाला आणि बारामतीत सुद्धा अजित पवारांवर सपाटून मार खावा लागला असे जानकर यांनी सांगितले.
दादा धंद्यात हुशार, त्यांनी गोठा सुरू करावा : उत्तम जानकर
दादा कधीच नेता नव्हता आणि होऊ शकत नाही म्हणून त्यांनी आता चांगल्या प्रतीच्या जर्सी गायी, होस्टेन ,बंगलोरी अशा गायीचे चांगले पैदास केंद्र सुरु करावेत यात ते यशस्वी होतील. दादाला राजकारणातले काही सुद्धा कळत नसले तरी ते धंद्यात हुशार आहेत. त्यांचा हा गोठा देशपातळीवर चांगला होईल आणि त्या गोठ्याला भेट देण्यासाठी मी देखील जाईन अशा शब्दात उत्तम जानकर यांनी अजित पवार यांची खिल्ली उडवली.