Uddhav Thackeray On PM Modi : PM मोदी म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान"; ठाकरे म्हणाले, "नकली म्हणणारे हे..."
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्रप्रदेशातील सभेत बोलताना बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान असं म्हणत जोरदार हल्लाबोल केलेला, आता ठाकरेंनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
Uddhav Thackeray Targets to PM Modi : मुंबई : आपल्याला नकली संतान म्हणणारे बेअकली, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या (PM Narednra Modi) नकली शिवसेना (Shiv Sena) टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, तुम्ही आईला नोटबंदीच्या रांगेत उभं केलं, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्रप्रदेशातील सभेत बोलताना बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान असं म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "आता 17 मे रोजी मुंबईत येत आहेत. शिवाजी पार्कवर येतील, बाळासाहेबांच्या स्मारकावर जातील, नाक रगडतील, स्टेजवर जाऊन ढसाढसा रडतील... हो... ही नकली माणसं... बेअकली माणसं... मी उघड बोलतोय, कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्हीसुद्धा नकली आणि बेअकली आहात. तुम्ही या माझ्या शिवसेनेला नकली म्हणता... तुम्ही बाळासाहेबांच्या सुपुत्राला नकली संतान म्हणताय, तुम्हाला मान्य आहे का रे हे? ज्या ठाकरे घराण्यानं अगदी माझ्या आजोबांपासून महाराष्ट्राची सेवा केली... आणि आम्ही तुमची साथ सोडली, कारण तुम्ही आम्हाला ढकललंत."
…तेव्हा लाज वाटली नाही का? : उद्धव ठाकरे
"तुम्ही नोटबंदीच्या वेळी तुमच्या आईला रांगेत उभं केलं होतं. 90 वर्षांच्या माऊलीचा वापर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केला. तेवढा मी निर्देयी नाही. कारण 'मातृदेव भव:’ आणि पितृदेव भव:' हे माणणारं आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका, बाळासाहेब म्हणायच्या आधी हिंदुहृदयसम्राट म्हणायला शिका. नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो. तुम्हाला हिंदुहृदयसम्राट म्हणायला जमत नसेल तर ते महाराष्ट्राची जनता तुम्हाल शिकवेल", असेही ते म्हणाले. पुढे बोलताना, “मी जर नकली असेल, तर प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती करताना एनडीएचे घटकपक्ष म्हणून माझी सही घेतली होती. तेव्हा लाज वाटली नाही का? असा प्रश्नही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला.", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणालेले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्रप्रदेशातील सभेत बोलताना थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान असं म्हणत मोदींनी ठाकरेंवर प्रहार केला होता. पंतप्रधान मोदी सभेत बोलताना म्हणालेले की, "काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातले लोक अरबमधील लोकांसारखे दिसतात. मी जरा बाळासाहेब ठाकरेंचे नकली शिवसेनेचे पुत्र आहेत, त्यांनी जरा बाळासाहेबांना आठवावं. मला बाळासाहेंबांच्या नकली मुलाला विचारायचं, त्यांचे मेंटॉर वयोवृद्ध नेत्यालाही विचारायचंय की, यांनी म्हटलंय पश्चिम भारतातील लोक अरब वाटतात. महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे? काँग्रेसला वाटतं की, उत्तर भारतातले लोक गोऱ्यांप्रमाणे दिसतात. तुम्ही हे वक्तव्य मान्य कराल? सत्तेसाठी देशाची वाटणी करणारी काँग्रेस आता भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यावर उतरली आहे."
पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray - Narendra Modi : मला नकली संतान म्हणणारे बेअकली! थेट मोदींवर पलटवार