Video: आधी तिकडं बघितलं, मग जुनं गाणं म्हटलं, मित्रपक्षाला 'ठाकरेस्टाईल चिमटा'; शरद पवारांसह सर्वांनाच हसू
राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. तर, महायुतीच्या पक्षांची चांगलीच पिछेहाट झाल्याचं दिसून आलं.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. या यशात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, सर्वाधिक जागा लढवून महाविकास आघाडीत शिवसेनेला कमी जागा मिळाल्या. तर, तुलनेने कमी जागा लढवून मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला (Congress) 13 तर राष्ट्रवादीला 9 जागांवर विजय मिळाला असून शिवसेनेला (Shivsena) केवळ 7 जागा जिंकता आल्या आहेत. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उद्धव ठाकरेंनी मजेशीर ठाकरेस्टाईल उत्तर दिलं. त्यानंतर, पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. तर, महायुतीच्या पक्षांची चांगलीच पिछेहाट झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये चांगला उत्साह दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आणि सर्वच छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे आभार मानले. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी, उद्धव ठाकरेंनी भाजपविरुद्ध चांगलीच फटकेबाजी केली. तर, पत्रकाराच्या प्रश्नावर काँग्रेसला गाण्यातून चिमटा काढला.
उद्धव ठाकरेंनी गायलं गाणं
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा मिळवण्यात शिवसेना म्हणजेच तुम्हाला यश आलं. मात्र, निवडणूक निकालानंतर तुमच्या मित्र पक्षांचा परफॉर्मन्स चांगला राहिला, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी गाणं म्हटलं, या गाण्यावर सगळ्यांनाच हसू आलं. उद्धव ठाकरे म्हणाले, एक फार जुनं गाणं आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही, पण पवारसाहेब तुम्हाला नक्की माहिती असेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या गाण्याचे बोल पत्रकार परिषदेत माणिक वर्मा याचं ते गाणं आहे. ''पारिजात पडला माझ्या दारी, फुले का पडती शेजारी, असे म्हणताच एकच हशा पिकला. तसेच, तरी देखील आम्ही पारिजाताला खतपाणी घालण्याचं सोडणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
विधानसभेला महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढणार
येत्या 2-3 महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आहेत. मोदी सरकार आता एनडीए सरकार झालंय. त्यामुळे, दिल्लीचं हे सरकार किती दिवस चालेल, हे माहिती नाही. मात्र, देशाची जनता या निवडणुकींच्या निमित्ताने जागी झालीय, हे या निवडणुकीचं मोठं यश असल्याचे मी मानतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आमची प्राथमिक बैठक झाली असून येणारी विधानसभादेखील आम्ही सामाजिक संघटना व घटकपक्षांना सोबत घेऊनच लढणार आहोत, असे म्हणत एकप्रकारे विधानसभा निवडणुकी एकत्रच लढणार असल्याची घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. पक्ष आणि चिन्ह यासंदर्भातील निकालाला आम्ही कोर्टात आव्हान दिलंय. पुढील महिनाभरात त्याचा निकाल येईल, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.