Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
Maharashtra Kesri 2025: अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भाग्यश्री फंड हिने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. कोल्हापूरची अमृता पुजारी उपविजेती ठरली.
वर्धा: यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बाजी मारत पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने मानाची चांदीची गदा पटकावली आहे. भाग्यश्री फंड आणि कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीमध्ये भाग्यश्रीने 2-4 अशा फरकाने बाजी मारली. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा देवळीच्या रामदास तडस इनडोर स्टेडियममध्ये भरली होती. यंदा भाग्यश्री फंड हिने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. तिला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब प्रदान करण्यात आला. माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघांचे अध्यक्ष रामदास तडस यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती यांनी या स्पर्धेला उपस्थिती लावली होती.
भाग्यश्री फंड आणि अमृता पुजारी यांच्यातील अंतिम लढत चुरशीची झाली. दोन्ही मल्लांनी बांगडी, पट, ढाग, कलाजंग असे एकाहून एक डाव टाकले. मात्र, भाग्यश्री फंड हिने 2-4 अशा फरकाने बाजी मारली. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वेदिका सारने (कोल्हापूर), ज्योती यादव (जळगाव) यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळवले.
या विजयानंतर भाग्यश्री फंड हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तिने म्हटले की, मी महाराष्ट्राची पहिली ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले,यासाठी आज खूप चांगले वाटत आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. माझ्या यशात आई-वडील, नवरा, सासू-सासरे यांचा खूप मोठा हात आहे. पैलवानांचे कष्ट त्यांनाच माहिती असतात. हरणारा आणि जिंकणारा दोघांनीही कष्ट केलेले असतात. यंदाच्या स्पर्धेला मुलींचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे महिला मल्लांचा हुरुप वाढेल. आर्थिक मदत नसल्याने अनेक महिला पैलवान कुस्ती सोडून देतात. त्यामुळे सरकारने अशा महिला मल्लांना आर्थिक मदत मिळावी, अशी माझी अपेक्षा असल्याचे भाग्यश्री फंड हिने सांगितले. भाग्यश्री फंड हिला चांदीची गदा, रोख 31 हजार रुपये देण्यात आले. महिला महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत पाहण्यासाठी तब्बल 4 हजार प्रेक्षक उपस्थित होते. 50 किलो वजनी गटात कोल्हापूरच्या नंदिनी साळोखे हिने पहिले स्थान पटकावले. तर कोल्हापूरच्याच रिया ढेंगे हिने दुसरे स्थान पटकावले. तर 55 किलो वजनी गटात पुण्याच्या सिद्धी ढमढेरे हिने पहिले स्थान मिळवले.
आणखी वाचा
तिलक वर्माने तारलं, दोन गडी राखून भारताचा इंग्लंडवर विजय, विजयी पताका फडकवण्यासाठी दमछाक!