Dasara Melava : आव्वाज कोणाचा...? दोन्ही दसरा मेळाव्यांपैकी कोणत्या गटाचा आवाज सर्वाधिक?
Dasara Melava : दोन्ही दसरा मेळाव्यांपैकी शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरील आवाज अधिक असल्याचं समोर आलं आहे. आवाज फाऊंडेशनकडून दोन्ही दसरा मेळाव्यातील आवाजाच्या मर्यादेची चाचणी करण्यात आली.
Dasara Melava : राज्यभरातील जनतेची उत्सुकता वाढवलेले शिवसेनेच्या ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) दसरा मेळावे बुधवारी (5 ऑक्टोबर) पार पडले. या दोन्ही दसरा मेळाव्यांपैकी शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरील आवाज अधिक असल्याचं समोर आलं आहे. आवाज फाऊंडेशनकडून दोन्ही दसरा मेळाव्यातील आवाजाच्या मर्यादेची चाचणी करण्यात आली. या चाचणीत बीकेसीपेक्षा शिवाजी पार्कमधील डेसिबलची मर्यादा अधिक असल्याचं स्पष्ट झालं. ढोल-ताशांमुळे शिवाजी पार्कवर 101.6 डेसिबलपर्यंत आवाज पोहोचला, जो शाळा आणि नर्सिंग होमच्या अगदीच बाजूला होता.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर पार पडला. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीच्या मैदानावर झाला. या मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. कोणाच्या मेळाव्याला किती गर्दी झाली, कोणाचा मेळावा सरस ठरला, याचे अंदाज बांधले जात असतानाच आता आवाजाच्या बाबतीत शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाचा डेसिबल जास्त असल्याचं समोर आलं.
जाणून घेऊया शिवाजी पार्कवर भाषण केलेल्या नेत्यांच्या आवाजाचा डेसिबल किती?
- शिवाजी पार्कवरील नेत्यांच्या भाषणांपैकी किशोरी पेडणेकर यांच्या आवाजाचा डेसिबल 97 db पर्यंत होता.
- तर सुषमा अंधारे यांच्या आवाजाची रेंज 77.6 ते 93.1 डेसिबल इतकी होती.
- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भाषणाच्या आवाजाची रेंज 87.4 ते 96.6 डेसिबलपर्यंत होती.
- याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या आवाजाची रेंज 68.6 ते 88.4 डीबीपर्यंत होती.
त्याचवेळी बीकेसी मैदानावर झालेल्या नेत्यांच्या भाषणाचा आवाज सरासरी 80 ते 88 डेसिबलपर्यंत होता. वांद्रे-कुर्ला संकुलातील रीडिंग मैदानाच्या बाहेरील रस्त्यावरुन घेण्यात आली आहे.
- धैर्यशील माने यांच्या भाषणाचा आवाज सर्वाधिक 88.5 डीबी होता.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची रेंज 81.7 ते 91.6 डीबी होता
कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. पोलिसांच्या अंदाजानुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे एक लाख 25 हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात सुमारे 65 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.