Uddhav Thackeray Exclusive : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, शिंदे भाजपमध्ये विलीन होतील : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Exclusive : आम्हाला नकली शिवसेना म्हणतात मग मोदींना महाराष्ट्रात 25 सभा का घ्याव्या लागतात असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे.
मुंबई: भाजप हा संपलेला पक्ष आहे, त्यांना स्वतःची पोरं होत नाहीत किंवा नकली संतानही होत नाही, त्यामुळेच त्यांना इतर पक्ष फोडावे लागतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी झोपले नसल्याने त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. 4 जूननंतर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना भाजपवर टीका केली.
घाटकोपरमध्ये दुर्घटना घडूनही मोदींनी रोड शो केला
उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. गद्दारांना आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्लीतील शाहांनाही माफ करत नाही. जनतेत आक्रोश आणि सूडाची भावना असून गेली दहा वर्षे भाजपच्या जुमल्याला जनता कंटाळली आहे. घाटकोरपमध्ये दोन दिवसांपूर्वी दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही मोदींनी वाजत गाजत रोड शो केला. लोकांना कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली. त्यामुळे लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड आक्रोश आहे."
मोदींचा मेंदू थकला, त्यांना आरामाची गरज
नकली शिवसेना, नकली संतान असा मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मोदी सुद्धा माणूस आहेत. गेली 10 वर्षे ते झोपले नाहीत असं म्हणतात. त्यामुळेच त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, त्यांचा मेंदू क्षीण झाला आहे. असं असूनही भाजपकडून पुन्हा मोदींना तिसऱ्यांदा बोहल्यावर चढवण्याची तयारी सुरू केली आहे. मोदीपण माणूसच आहेत, ते थकणारच ना? त्यांच्या मेंदूला ताण पडला असल्याने 2014 आणि 2019 साली त्यांच्या पंतप्रधानपदासाठी मी सही केली होती, शिंदेंनी नाही हे मोदी विसरलेत. मोदी एकदा म्हणतात की उद्धव ठाकरेंना मदत करतो, दुसऱ्या दिवशी म्हणतात की नकली संतान. त्यामुळे त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून त्यांना आता आरामाची गरज आहे."
आम्हाला नकली शिवसेना म्हणत असाल तर महाराष्ट्रात एवढ्या सभा का घेता असा सवाल उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना विचारला. औरंगजेब महाराष्ट्रात 25 वर्षे होता, आता मोदीही उद्या 25 वी सभा महाराष्ट्रात घेत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राने त्यांना गुढघे टेकायला लावले आहेत.