Uddhav-Raj Thackeray Alliance : वेळ आली आहे एकत्र येण्याची, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोस्ट, मनसेसोबत युती दृष्टीक्षेपात?
Uddhav-Raj Thackeray Alliance : ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या या एक्स पोस्टमधून ठाकरेंची शिवसेना मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची साद सर्वांना घालत आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) काही दिवसांच्या परदेशी दौऱ्यावरती गेल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाचे नेते मुंबईमध्ये परत आल्यानंतर युतीबाबत निर्णय घेतील, चर्चा करतील अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली सोशल मिडिया एक्सवरील पोस्ट चर्चेत आली आहे. "वेळ आलीये, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी" अशा आशयाची पोस्ट शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली आहे.
ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या या एक्स पोस्टमधून ठाकरेंची शिवसेना मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची साद सर्वांना घालत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलं जाणारी एक्स पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. मागील आठवड्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिटाळी चर्चेचा विषय बनली होती.
वेळ आलीयं, एकत्र येण्याची
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 26, 2025
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी! pic.twitter.com/aukbsiNPK5
या पोस्टच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माहिती घेतली असता अशा प्रकारच्या एक्स पोस्ट सकाळी केल्या जातात आणि एक प्रकारे मोटिवेशनल पोस्ट ज्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा यासाठी या पोस्ट असतात असं म्हणणं आहे. शिवाय या पोस्ट मधून सर्व महाराष्ट्रातील लोकांना आपण मराठी अस्मितेसाठी आणि मुंबई महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहोत असे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या एक्स पोस्ट या ठाकरेंच्या शिवसेनेकडून तयार करण्यात येत आहे असं सांगण्यात आलं आहे. मात्र, अनेकांनी या पोस्टचा संदर्भ मनसे शिवसेना यांच्या मनोमिलनाशी जोडल्याचे दिसून येत आहे. या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज-उद्धव ठाकरे दोघेही परदेशात
उध्दव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावरती आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेशी दौऱ्यावरती आहेत. राज ठाकरे 29 एप्रिलला मुंबईत परतणार आहेत. युतीच्या चर्चेदरम्यान ठाकरे बंधुंचा हा परदेश दौरा सुरू आहे. तर दोन्ही नेते मुंबईत परतल्यानंतर कोणता निर्णय होणार, युतीवर चर्चा होणार का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
राज ठाकरे युतीबाबत काय म्हणाले होते?
चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत. महाराष्ट्र फार मोठा आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं अन् एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट नाही. मी महाराष्ट्राच्या कल्याणाच्या मार्गात माझा अहंकार आडवा येऊ देणार नाही. परंतु, हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. मला तर वाटतं सगळ्या पक्षांतल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा”.
उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिसाद दिला?
दरम्यान, राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्राच्या हितासाठी मी एकत्र येण्यास तयार आहे. मी किरकोळ मुद्दे बाजूला ठेवण्यास तयार आहे. माझे कधीही मतभेद नव्हते. तरीही मी सर्व वाद बाजूला ठेवले आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं.
























