Thackeray vs Shinde : खरी शिवसेना कोणाची? निवडणूक आयोग फैसला कसा देणार? दोन्ही गटाचे प्लॅन काय?
Thackeray vs Shinde : धनुष्यबाणावर कोण मोहर उमटवणार याचा फैसला निवडणूक आयोग देणार आहे. पण आयोग हा निर्णय देणार कसा? यांची प्रक्रिया कशी असते? दोघांनीही चिन्ह नाही मिळालं तर त्याचं प्लॅन बी काय असणार?
Thackeray vs Shinde : खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची? धनुष्यबाण कोणाचा? दोघांनाही धनुष्यबाण मिळालं नाही तर काय? शिंदे आणि ठाकरेंची निशाणी काय असणार ? असे एक ना अनेक प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सुनावणीनंतर प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेलं आहे. निवडणूक आयोगाकडे बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया आहे आणि या प्रकरणातही आयोगाकडून ही प्रक्रिया केली जाईल, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या पारदर्शकतेच्या परीक्षेत कोण पास आणि नापास हे येत्या काळात ठरेलच. पण त्यापूर्वीच दोन्ही गटांनी आपले प्लॅन बी तयार ठेवले आहेत. कारण लढाई अस्तित्त्वाची आहे. ही लढाई संघर्षाची आहे. फैसल्याकडे राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे.
आता ही पारदर्शक प्रक्रिया नेमकी कशी असते हे समजून घेणं गरजेचं आहे. एक नजर टाकूया महत्त्वाच्या मुद्द्यांवर
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोग 'खरी' शिवसेना कशी ओळखणार?
- संघटनात्मक बांधणी आणि विधिमंडळातील संख्याबळ या दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहे या दोन्ही बाबींचा विचार केला जाईल
- ज्या गटाकडे संख्याबळ अधिक आहे त्याचा बाजूने पारडं झुकू शकतं.
- या दोन्ही गटाने गेल्या काही वर्षांत, महिन्यात केलेली राजकीय कामं आणि सक्रियता विचारात घेतली जाईल.
- शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी हा युक्तिवाद नाकारण्यात आला आहे.
- पक्षाचे चिन्ह, ध्वज आणि नाव कोणाला मिळेल हे ठरवण्यासाठी 1968 सालाचे आदेश आहेत.
- सर्वात आधी निवडणूक आयोगाकडून दोन्ही बाजूच्या गटांना वकिलांमार्फत बोलावण्यात येईल.
- ज्यात खरी शिवसेना कोण यासाठी कागदपत्र सादर करत आपला दावा सिद्ध करावा लागेल.
देशात याधीही अंतर्गत बंडाळीचे प्रकार
भारतात अशा प्रकरचे बंड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी समाजवादी पार्टी, एआयएडीएमके, लोकजनशक्ती पार्टी यांच्यामध्येही अंतर्गत बंड झालं होतं. 2017 साली अखिलेश यादव यांना विधीमंडळातल्या सदस्यांचा मोठा पाठिंबा होता. त्यामुळे सायकल चिन्ह त्यांना गेलं होतं. तर 2021 मध्ये चिराग पासवान यांच्यात झालेल्या बंडाळीनंतर त्याचं चिन्ह गोठवलं होतं.
कोणतं संख्याबळ किती महत्वाचं?
- संघटना आणि विधिमंडळाचे किती संख्याबळ दोन्ही गटांकडे आहे, यावर निवडणूक आयोगाचं लक्ष असेल
- यात दोन्ही विधानसभा आणि संसदेतील सदस्यांची संख्या समाविष्ट असेल
- दोन्ही बाजूंना यासंदर्भात प्रतिज्ञापत्र स्वरुपात पुरावा म्हणून सादर करावे लागेल
- निवडणूक आयोग बहुमताचा नियम वापर असते, विधानसभा आणि संघटनात्मक बळ कोणत्या गटाकडे याची तपासणी आयोग करेल
- कोणत्या गटाकडे किती अधिक आमदार आणि खासदार हा बहुमताचा आकडा ठरल्यानंतर संघटनात्मक गोष्टींकडे आयोग वळेल
- पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी पात्र असलेल्यांचा विचारात घेतलं जाईल
- कोणत्या गटाला कोणाचा पाठिंबा आहे, यासाठी स्वाक्षरी असलेली प्रतिज्ञापत्र दोन्ही गटांना सादर करावे लागेल
- एखाद्या सदस्याने दोन्ही गटांसाठी सही केली असल्याचं निवडणूक आयोग ते देखील तपासेल
- ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच निवडणूक आयोग कोणत्या गटाला चिन्ह मिळेल याचा निर्णय घेईल
- 1969 साली काँग्रेस विभाजनानंतर सर्वोच्च न्यायालयाने या तत्त्वाला मान्यता दिली
- बहुमताचे तत्व वापरत न्यायालयीन छाननीच्या कसोटीवर या सर्व गोष्टी उतरल्या
- दुसरीकडे, कोणत्या गटाकडे बहुमत आहे हे लगेच सांगता येत नसल्यास आयोग पक्षाचे चिन्ह गोठवू शकते
- सोबतच दोन्ही गटांना नवीन नावांसह नोंदणी करत, पक्षातील नावांना प्रत्यय लावून तात्पुरता निवडणूक लढवण्यास सांगू शकतं
- म्हणजे उदाहरण शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) असा वापर होऊ शकतो
- मात्र असं क्वचितच घडतं, आयोग कोणत्या तरी एका बाजूने आपला निर्णय देतंच
चिन्ह आपल्यालाच मिळणार, दोन्ही गटांना विश्वास
इकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरेंच्यापेक्षा आमदाराचं बळ जास्त आहे तर दुसरीकडे पक्षाच्या घटनेनुसार महत्वाच्या 287 कार्यकारणीसह लाखोंच्या संख्येने भरुन घेतलेली प्रतिज्ञापत्रांची संख्या ठाकरेंकडे जास्त आहे. त्यामुळे जर समजा चिन्ह गोठवलं तर दोन्ही गट नवीन चिन्हांसाठी शोधाशोध करत आहेत. पण दोन्ही गटांना विश्वास आहे की धनुष्यबाण आम्हालाच मिळणार आहे.
धनुष्यबाण नसेल तर दुसरं कोणतं चिन्ह?
पण जर तसं झालं नाही तर दोन्ही गटांची तारांबळ उडणार एवढं नक्की. त्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून विविध चिन्हांची चाचपणी सुरु आहे. धनुष्यबाणावर निवडणूक लढणं दोघांसाठी सोपं आहे. त्यासाठी दोन्ही गटाची धडपड धनुष्यबाणासाठीच आहे. पण धनुष्यबाण नाही तर दुसरी काय काय चिन्ह असतील हे लवकर कळेल.