Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन बीड जिल्ह्याचं राजकारण तापलं असून मुंडे बंधु-भगिनींवर स्थानिक लोकप्रतिनीधींकडून आरोप केले जात आहेत.
धाराशिव : राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी बीडमधील घटनेवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांना टोला लगावला. सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनामा झाल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, बीडसारख्या घटना अनेकही जिल्ह्यात होतात, कालच पुण्यात मुलीची हत्या झाल्याचं त्यांनी सांगितलं. आता, पंकजा मुंडेंच्या टीकेला आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही बीड नाही, तर परळीबाबत बोलतोय, असा पलटवार धस यांनी केला. बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम आम्ही काही केलं नाही, आम्ही बीडबद्दल बोलत असून आम्ही फक्त परळी पॅटर्न बद्दल बोलतो. बीड जिल्हा आमचा शाबूत आहे, आमचं आमचं व्यवस्थित सुरू आहे. तुमच्या परळी पॅटर्नशी आमचा काही संबंध नाही, तो परळी पॅटर्न बदनाम होता. आमच्या आष्टीच्या लोकांनी कोणाच्या जमिनी हडपल्या नाहीत. परळीचे लोक हे तुमच्याशिवाय असे वागू शकतात का? कृषीमंत्री तुमचाच आहे, परळी पॅटर्न हा देखील तुमचाच आहे. याची सुरुवात बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतून झाली आहे, सुरुवात 200 कोटींपासून झाली आहे, असा पलटवार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन बीड जिल्ह्याचं राजकारण तापलं असून मुंडे बंधु-भगिनींवर स्थानिक लोकप्रतिनीधींकडून आरोप केले जात आहेत. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामाही मागितला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज धाराशिव येथील मोर्चा झाल्यानंतर आमदार धस यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी, पंकजा मुंडेंच्या टीकेवरही पलटवार केला. तर, मोक्का गुन्ह्याबाबतही स्पष्टीकरण दिलं. वाल्मिक कराडवरती आत्ताच मोका लागणार नाही, कराड हा आता एका गुन्ह्यात आरोपी आहे. वाल्मीक कराड हा 302 मध्ये अजून आरोपी नाही. मोक्का लागण्याची एक पद्धत आहे, माहिती न घेता काही लोक बोलतात, त्याला रीतसर परवानगी पाहिजे. न्यायालयीन चौकशीसाठी देखील माननीय हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते, आमचे खासदार बजरंग सोनवणे यांना ती पद्धत कदाचित माहिती नसावी, असे म्हणत वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याबाबत धस यांनी भाष्य केलं.
धस यांच्यामुळेच बीड बदनाम
परळी गुन्हेगारी बाबत मला आकडे माहीत नाही. धस यांच्यामुळे तर बीड बदनाम झालं आहे, राजकीय भूमिका न घेता विषय संवेदनशील रीतीने समजून घेतला असता तर बीड अस बदनाम झालं नसते. आमच्या जिल्ह्यात लोक स्वाभिमानी आहेत...मी महिला राजकारणी म्हणून तिथं काम करते. सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यातील आहेत. आम्ही काम करतो नाहीतर दरोडे करायला गेलो असतो ना.. अशा घटनेने जिल्हा बदनाम होत असेल तर आरटीआय मधून माझ्या कडे सर्व जिल्ह्यांची महिती आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही भाष्य
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य करताना भावाची पाठराखण केली तर धस यांना टोलाही लगावल्याचं दिसून आलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावर मी कॉउंटर करणार नाही. ते जर म्हणत आहेत, शोध लागेपर्यंत कारवाई करणार नाही, त्यावर मी रोज काय बोलू असे पंकजा यांनी म्हटले. तर, धसवर मी काय बोलू,मी कुठं गप्प आहे. मी एसआयटीची मागणी केली होती, पहिली मागणी मी केली. माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही. मागच्या 2 वर्षात का बोलले नाही, असा सवाल पंकजा मुंडेंनी म्हटले.