Sudhir Mungantiwar : 'मी तसे म्हणलोच नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला'; विठुरायाच्या दर्शनानंतर सुधीर मुनगंटीवारांना आली उपरती, म्हणाले....
Sudhir Mungantiwar : नाशिकच्या एका कार्यक्रमात माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. माझ्या त्या वक्तव्यात कुठेच चुकीचे काही नव्हतं, असा खुलासा भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

Sudhir Mungantiwar : नाशिकच्या एका कार्यक्रमात माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. खरे तर आयोजकांनी सांगितले होते की आमच्या व्याख्यानमालेत आल्यानंतर प्रत्येकाचे प्रमोशन होतं. त्यावर बोलताना मी एवढेच म्हणालो माझे प्रमोशन होण्यासाठी आमचे सरकार पुन्हा यावे लागेल आणि जे दुसरे नेते होते ते विरोधकात असल्याने त्यांचे प्रमोशन होण्यासाठी एक तर त्यांना आमच्या पक्षात यावे लागेल किंवा त्यांचे सरकार यावे लागेल. मात्र माझ्या या वक्तव्यात कुठेच चुकीचे काही नव्हतं, असा खुलासा भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
मंत्रीपद न मिळणे म्हणजे काम थांबलं, असे नाही- सुधीर मुनगंटीवार
विठ्ठलाची कृपा असताना कोणच कोणाचे खच्चीकरण करू शकत नाही, देवाचे दर्शन नुसते घ्यायचे नसते तर 28 युगे विटेवर उभा असलेल्या देवाकडून सहनशक्ती ही घेतली पाहिजे, असे बोलत आपल्या वक्तव्यावर आता मर्यादा ठेवणार असल्याचे संकेत मुनगंटीवार यांनी दिले. मंत्रीपद न मिळणे म्हणजे काम थांबत नसते. नवीन चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे असतं. त्यानुसार रोटेशन नी मंत्रीपद दिली जातात. त्यामुळे मंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अर्थ नसल्याचे ही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
शिंदेंना काही बोलायचे असेल तर ते अजित दादांना बोलतील
एकनाथ शिंदे आक्रमक नेते आहेत. त्यांना जेव्हा काही वाटेल तेव्हा ते कॅबिनेटमध्ये अजित पवारांना बोलतील. शिंदे हे अमित शहांशी काहीही बोलले नाहीत, असा खुलासा थेट अजितदादांनी केला आहे. त्यामुळे शिंदेंना काही बोलायचे असेल तर ते थेट कॅबिनेटमध्ये अजित दादांना बोलतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्यात फाइल अडवत असल्याबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रार केली असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना मुनगंटीवार बोलत होते.
दैनिक सामना जर बातम्या देत असेल तर...
सरकारची अवस्था इतकी वाईट आहे की कॅबिनेटमध्येही खून होतील, अशा पद्धतीने दैनिक सामना जर बातम्या देत असेल तर आता सर्वसामान्य लोक त्याला फक्त गंमत जंमत म्हणून बघतील, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. मंगेशकर यांना भारतरत्न, महाराष्ट्र भूषण सारखे गौरव प्राप्त झालेले आहे. त्यांच्याबद्दल काहीही बोलणं चुकीचं आहे. जर वडेट्टीवार यांना तसं काही वाटत होतं, त्यांच्याकडे माहिती होती तर त्यांचे सरकार असताना त्यांनी कारवाई का केली नाही? असा प्रतिप्रश्न करीत पुणे प्रकरणात दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई होईल, मात्र मंगेशकर कुटुंबाची बदनामी कशाला? असा सवाल मूनगंटीवार यांनी केला.
हे ही वाचा























