Shivsena Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरेंना दिलासा, शिवसेना नाव अन् चिन्हावर झाली सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट
Shivsena Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

Shivsena Symbol hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या निर्णयावरील आव्हान (Shivsena Symbol Hearing In Supreme Court) याचिकेवर आज (14 जुलै) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी आपण मुख्य याचिकेवर निर्णय करू तेच योग्य राहील, असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. आपण ऑगस्टची तारीख ठरवू, तोपर्यंत तुम्ही निवडणुका आल्या, तर निवडणूक लढा, असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून जी अनिश्चितता होती, त्यावर आज सुप्रीम कोर्टाने स्वत:हून ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ, असं सांगितल्याने सुप्रीम कोर्टातील आजच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना तुर्तास दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. ऑगस्टमध्ये शिवसेना नाव आणि चिन्हावर निकाल लागल्यास महाराष्ट्रातील राजकारणावर, विशेषत: आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकू शकतो.
सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?,पॉईंट टू पॉईंट-
1. शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
2. उद्धव ठाकरेंच्या मागणीला एकनाथ शिंदेंचा विरोध
3. शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्क्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.
4. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याप्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली.
5. न्यायमूर्तींनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो. तोपर्यंत तुम्ही निवडणुका आल्या तर निवडणूक लढा, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.
शिवसेना आणि धनुष्यबाण वादाचा घटनाक्रम-
1. फेब्रुवारी 2023
निवडणूक आयोगाकडून पक्ष व चिन्ह शिंदे गटास बहाल
ठाकरे गटाला "शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)" हे नाव आणि "मशाल" चिन्ह
2. 23 फेब्रुवारी 2023
आयोगाच्या निर्णयास ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान
निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
अंतिम निकालापर्यंत शिंदे गटास चिन्हाचा वापर करण्यास मुभा
3. 7 मे 2025
तातडीच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार
4. 14 जुलै 2025
शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये धनुष्यबाणावर ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेणार असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.
दोन्ही शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातीलं सुनावणीसाठी माहिती-
जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 आमदारांसह बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपच्या समर्थनाने नवीन सरकार स्थापन केले. फेब्रुवारी 2023 मध्ये, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि "धनुष्यबाण" हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाला "शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)" हे नाव आणि "मशाल" हे नवीन चिन्ह देण्यात आले.
-उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात 22 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी "शिवसेना" नाव आणि "धनुष्यबाण" चिन्हावर दावा केला.
-ठाकरे गटाने असा युक्तिवाद केला की, निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे आणि पक्षाची मूळ ओळख धनुष्यबाण चिन्हाशी जोडलेली आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो.
- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला, परंतु पूर्ण निकालापर्यंत शिंदे गटाला चिन्हाचा तात्पुरता वापर करण्याची परवानगी दिली.
- मे 2025 मध्ये (7 मे) सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली, परंतु निकाय निवडणुकांपूर्वी तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. न्यायमूर्ती सूर्या कांत यांनी म्हटले की, स्थानिक निवडणुकांमध्ये चिन्हाचा फारसा प्रभाव पडत नाही.
- ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातील निकालाचा दाखला देत युक्तिवाद केला, जिथे अजित पवार गटाला चिन्ह वापरताना जाहीरपणे स्पष्ट करावे लागले की त्यांचा तात्पुरता वापर आहे.
- शिवसेना फुटीशी संबंधित आमदार अपात्रता प्रकरणात, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी 2024 मध्ये शिंदे गटाला "खरी शिवसेना" म्हणून मान्यता दिली. ठाकरे गटाने हा निर्णयही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला आहे, परंतु त्याची सुनावणी स्वतंत्रपणे सुरू आहे.
-आज, 14 जुलै 2025 रोजी, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव आणि "धनुष्यबाण" चिन्हाच्या वादावर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर होईल.
- ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023 च्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्याने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या कोर्टात दोन्ही गट आपली बाजू मांडतील, आणि यामध्ये धनुष्यबाण चिन्हाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
- याचिकेत ठाकरे गटाने असा युक्तिवाद केला आहे की, धनुष्यबाण हे शिवसेनेच्या मूळ ओळखीचा भाग आहे आणि शिंदे गटाला ते देणे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करू शकते, विशेषत: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर.
- राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातील निकालाचा दाखला देत, ठाकरे गट शिंदे गटाला चिन्ह वापरताना तात्पुरत्या वापराची जाहीर कबुली देण्याची मागणी केली आहे.























