Shivsena: लोकसभेला मदत करतो, विधानसभेला आमचा विचार करा; शिंदे गटातील आमदारांची ठाकरेंना ऑफर; सचिन अहिरांचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics: लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटाचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तसे घडल्यास हा शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरु शकतो.
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेतील आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार हे सध्या ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Camp) संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याशिवाय, शिंदे गटातील अनेक आमदारांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) ठाकरेंना मदत करण्याची तयारी दाखवली होती. यामध्ये मुंबईतील अनेक आमदारांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या खासदारांना घेऊन दिल्लीत गेले असताना ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे राज्यात असणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. आमच्या संपर्कात सहा ते सात आमदार असल्याची माहिती कुठून समोर आली माहिती नाही. मात्र, हा आकडा 16 किंवा अगदी 40च्या घरातही असू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले असतील. आता आपलं सरकार जाणार, ही भीती त्यांच्या मनात असावी. त्यांची भीती आणि अस्वस्थता स्वाभाविक आहे. त्यांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. हा प्रयोग काही आता झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिंदे गटातील काही आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता. आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करु, पण विधानसभेला आमचा विचार करा, असा प्रस्ताव शिंदे गटातील या आमदारांनी ठाकरेंसमोर ठेवला होता, असे सचिन अहिर यांनी म्हटले.
ठाकरे गट 'या' एका अटीवर शिंदेंच्या आमदारांना परत घेणार
शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही, याबाबत ठाकरे गटात विचारविनिमय सुरु असल्याची माहिती आहे. जे आमदार शिंदे गटात गेले होते, मात्र तटस्थ राहिले होते. ज्यांनी शिंदे गटात राहूनही ठाकरे गटाविरोधात प्रतिक्रिया किंवा टोकाची टीका केली नव्हती, असा तटस्थ आमदारांना ठाकरे गटात पु्न्हा सामावून घेण्याविषयी विचार होऊ शकतो, अशी माहिती आहे.
निकालानंतर मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. यामध्ये मुंबईतील काही आमदार, पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि मराठवाड्यातील एका आमदाराचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणखी वाचा