Shiv Sena : शिवसेनेतील जुने मित्र, नवे प्रतिस्पर्धी; 9 ठिकाणी ठाकरेंची मशाल विरुद्ध शिंदेंच्या धनुष्यबाणात थेट लढत
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : राज्यात एकूण 9 ठिकाणी शिवसेनेतील जुने मित्र एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यापैकी तीन ठिकाणी मतदान पार पडलं असून इतर सहा ठिकाणी चुरशीची लढत आहे.
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडल्यानंतर आता 7 मे रोजी तिसरा टप्पा पार पडणार आहे. यापुढच्या तीनही टप्प्यांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस वाढत जाणार असल्याचं सध्यातरी राजकीय चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार निवडून यावा यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केला जात आहे. यातच शिवसेनेच्या फुटीनंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात आतापर्यंत नऊ ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंचे उमेदवार समोर आले आहेत.
मुंबईत प्रतिष्ठा पणाला
शिवसेनेत एकेकाळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले जुने सहकारी, मित्र आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं चित्र आहे. मंगळवारी शिंदे गटाने रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांची उमेदवारी जाहीर केली आणि आणखी दोन ठिकाणी जुने शिवसैनिक समोरासमोर आले. त्यामुळे या ठिकाणी ठाकरेंची मशाल आणि शिंदेंचे धनुष्यबाण हे आमने-सामने आले आहेत.
राज्यात आतापर्यंत नऊ ठिकाणी जुने शिवसैनिक एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. त्यापैकी यवतमाळ-वाशिम, बुलढाणा आणि हिंगोली या तीन ठिकाणी मतदान पार पडलं आहे. तर उर्वरित ठिकाणी आता काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे.
ठाण्याची जागा अद्याप जाहीर नाही
यापैकी ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र शिंदेंकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपचा असल्याचं सांगितलं जातंय. पण ठाणे पुन्हा शिंदेंच्या वाट्याला आलं तर या ठिकाणीही जुने शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
कोणत्या ठिकाणी ठाकरे-शिंदेंचे उमेदवार आमने-सामने
- मुंबई दक्षिण मध्य -अनिल देसाई वि. राहुल शेवाळे
- शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे वि. सदााशिव लोखंडे
- हातकणंगले - सत्यजीत पाटील वि. धैर्यशील माने
- दक्षिण मुंबई - अरविंद सावंत वि. यामिनी जाधव
- मुंबई उत्तर पश्चिम - अमोल कीर्तीकर वि. रविंद्र वायकर
- कल्याण- वैशाली दरेकर वि. श्रीकांत शिंदे
मतदान झालेले मतदारसंघ
- हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर वि. बाबूराव कदम
- यवतमाळ - वाशिम- संजय देशमुख वि. राजश्री पाटील
- बुलडाणा नरेंद्र खेडेकर वि. प्रतापराव जाधव
ही बातमी वाचा :