"ते आज तुमचे उद्या आमचे होतील", नितीश कुमार यांचा उल्लेख करत राऊतांचं सूचक विधान!
नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमत नाही, लवकरच चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार आमच्याकडे असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) निकाल जाहीर झाल्यानंतर आता भाजपकडून (BJP) नव्याने सरकार स्थापनेची तयारी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच एनडीएचा घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने (जदयू) आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) पक्षाने भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता लवकर नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांची इंडिया आघाडी सत्तास्थापनेची चाचपणी करत आहे, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र इंडिया आघाडीने विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेतली आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक विधान केलंय. त्यांच्या या विधानेच अनेक अर्थ काढले जात आहेत.
"जदयूने अग्नीवीर योजनेला विरोध केला"
सरकार चालवताना भाजपच्या नाकी नऊ येणार आहेत. मुळात एनडीए आहेच कुठे. चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनाच महत्त्व आहे. नितीशबाबू तर सर्वांचेच आहेत. चंद्राबाबू नायडू हेदेखील सर्वांचेच आहेत. ते आज तुमचे उद्या आमचे होतील. नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचे केसी त्यागी यांनी अग्नीवीर या योजनेला विरोध केला आहे. मोदी यांनी प्रचारादरम्यान जी आश्वासनं दिली, त्याला त्यागी यांनी विरोध केला.
"मी पुन्हा-पुन्हा सांगतो मोदी यांच्याकडे बहुमत नाहीये"
मोदी तर प्रचारात सांगायचे की काँग्रेस आणि इतर विरोधक सत्तेत आल्यास ते मुस्लिमांना आरक्षण देतील, असे सांगायचे. पण आता एनडीएतील चंद्राबाबू नायडू हे मुस्लीम आरक्षणाच्या समर्थन करतात. त्यामुळे आता भाजप काय करणार? असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा होणे बाकी आहे. म्हणूनच मी पुन्हा-पुन्हा सांगतो की नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमत नाहीये.
"आम्ही भाजपला बहुमत मुक्त केलं"
मोदी म्हणायचे की मी काँग्रेसमुक्त भारत करणार. पण आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजपा करून दाखवलं. तरीदेखील ते सरकार स्थापन करायला जात आहेत. लोकशाहीची ही विटंबना आहे, असा टोला राऊत यांनी केला.
हेही वाचा :
Pathardi Bandh: पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, युवक ताब्यात; आज पाथर्डी बंदची हाक