(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिर्डीचे मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे कोट्यधीश, पत्नीही साडेतीन कोटीची मालकीण
Bhausaheb Wakchaure Shirdi MVA Candidate : शिर्डी लोकसभेसाठी मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे कोट्यधीश असून त्यांची पत्नीही साडेतीन कोटीची मालकीण आहे. त्यांची एकूण संपत्ती किती आहे, ते जाणून घ्या.
Lok Sabha Election 2024 : शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) हे कोट्याधीश आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी एक कोटी 39 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर स्थावर आणि जंगम अशी तीन कोटी 55 लाख रुपयांची संपत्ती आहे. 2019 मध्ये वाकचौरे यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी दोन कोटी 50 लाख रुपयांची संपत्ती होती.
शिर्डीचे मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे कोट्यधीश
माजी खासदार असलेले वाकचौरे यांनी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातून शुक्रवारी महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्ज बरोबरच त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं आहे. वाकचौरे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. तर त्यांची पत्नी सरस्वती वाकचौरे याही बँकेत नोकरीला होत्या.
भाऊसाहेब वाकचौरे यांची संपत्ती किती?
- भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित माहिती नमूद केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे.
- भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे 29 लाख 50 हजार रुपये किमतीचे 50 तोळे सोने तर तीन लाख 62 हजार रुपये किमतीची पाच किलो चांदी आहे.
- त्यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे यांच्याकडे 29 लाख 50 हजार रुपये किमतीचे 50 तोळे सोने आणि दोन लाख 81 हजार किमतीची अडीच किलो चांदी आहे.
- 21 लाख रुपये किमतीचे दोन चारचाकी वाहने आहेत.
- एक लाख 50 हजार रुपये किमतीचे शेअर्स बरोबरच पाच लाख रुपयांची स्टेट बँकेत मुदत ठेव आहे.
- एक कोटी 24 लाख रुपयांची उसनवार आहे.
- भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे 23 लाख 52 हजार जंगम मालमत्ता तर पत्नी सरस्वती वाकचौरे यांच्याकडे 46 लाख 8 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
- पेन्शन, बँक आणि शेतीतून त्यांना उत्पन्न मिळत असून वाकचौरे यांच्या नावावर राहता तालुक्यातील निमगाव कोराळे येथे एक एकर शेती तर पत्नीचे नावे नेवासा तालुक्यातील कांगोणी, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शेती तर शिर्डी आणि निंबळक येथे प्लॉट आहेत.
सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तक त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 2009 साली हा मतदारसंघ राखीव झाला होता. त्यापूर्वी काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघावर होतं. मात्र 2009 नंतर सातत्याने शिवसेनेच्या उमेदवाराने या ठिकाणी विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :