Karnataka Election Result 2023: 'आमचं पहिलं ध्येय होतं की...', कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या पराभवावर काय म्हणाले शरद पवार? पाहा...
Sharad Pawar On Karnataka Election: कर्नाटकमधील काँग्रेसच्या अद्भूत विजयानंतर देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच राष्ट्रवादीचे शरद पवारांनीही कर्नाटक निवडणुकांवर भाष्य केलं आहे.
Sharad Pawar On Karnataka Election Results: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. कर्नाटकात भाजपचा पराभव करणे हाच आमचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल, असं मी गेल्या आठ-दहा दिवसांपासून जाहीर सभांमध्ये सांगत असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा आणि रोड शो केले असले तरी, लोकांचा रोष मतांच्या माध्यमातून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री होती, असंही शरद पवार म्हणाले.
वैतागलेल्या जनतेने भाजपला धडा शिकवला
कर्नाटकात काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या. सत्तेचा गैरवापर, यंत्रणांचा गैरवापर आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे वैतागलेल्या जनतेने भाजपला धडा शिकवल्याचं शरद पवार म्हणाले. मुळात भाजपचं राजकारण कर्नाटकच्या जनतेला आवडलं नव्हतं, त्यामुळे काँग्रेसचा विजय झाल्याचं ते म्हणाले.
कर्नाटकच्या जनतेचे आणि काँग्रेस पक्षाचे अभिनंदन
देशात चुकीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल मी कर्नाटकच्या जनतेचे आणि काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले. संपूर्ण देशात हीच स्थिती येईल, असंही ते म्हणाले.
भाजपचं सरकार नसलेल्या राज्यात पक्षांची फोडाफोडी करण्याचं सत्र
मोदी-शाह यांनी कर्नाटकमध्ये सभा घेऊनही काहीही परिणाम झाला नसल्याचं शरद पवार म्हणाले. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथे आमदार फोडण्याचं सत्र भाजपने सुरु केलं होतं, असं शरद पवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी जसा महाराष्ट्रात केला, तसाच प्रकार कर्नाटकात झाला. मागच्या वेळी कर्नाटकातही भाजपने फोडाफोडीचं राजकारण करुन डबल इंजिन सरकार स्थापित केल्याचं ते म्हणाले. त्यानंतर मध्य प्रदेश, गोव्यातही भाजपने फोडोफोडी केली होती. मात्र यावेळी जनतेने ती संधी भाजपला दिली नसल्याचं शरद पवार म्हणाले.
भारत जोडो यात्रा कर्नाटक निवडणुकीत उपयोगी
बहुसंख्य राज्यामध्ये भाजप सत्तेबाहेर आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल या बहुतांश राज्यांमध्ये भाजप सत्तेबाहेर असल्याचे पवार म्हणाले. कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कामी आली असं म्हणता येईल, असंही ते म्हणाले.
2024 मध्ये चित्र वेगळं असणार
2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा देशात काय चित्र असेल याचा अंदाज कर्नाटक निवडणुकीवरून येऊ शकतो, असं शरद पवार म्हणाले. धर्म आणि जातीच्या मुद्द्यावरुन निवडणूक जिंकता येत नाही, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराला दर्शवला होता पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्नाटकात शक्तिशाली आहे अशी स्थिती नाही, पण तरीही प्रयत्न म्हणून आम्ही काही उमेदवार उभे केले, असं शरद पवार म्हणाले. निपाणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार उत्तमराव पाटील यांना आम्ही शक्ती दिली होती, तिथे निर्णय येईल अशी अपेक्षा होती, असं पवार म्हणाले. पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये पाटील पहिल्या क्रमांकावर होते, पण नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर गेले. यशाची शाश्वती नाही, पण कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. भाजपचा पराभव करणे हे आमचे खरे उद्दिष्ट होते, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा
'मोदी है तो मुमकिन है' ही कल्पना लोकांनी आधीच नाकारली आहे. लोकांना महाराष्ट्रातही बदल हवा आहे आणितो पुढच्या निवडणुकीमध्ये दिसेल, असं शरद पवार म्हणाले. भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी आता महाराष्ट्रात एकत्र येणार असल्याचे संकेत पवारांनी दिले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र बसून पुढची योजना आखली पाहिजे, असं पवार म्हणाले. यासाठी, लवकरच शरद पवार सर्व पक्षांची एकत्रित बैठक घेणार आहेत.
हेही वाचा:
Why Congress Won Karnataka: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय का? जाणून घ्या कारणे